अमरावती : लोकसभा निवडणुकीत पराभूत होऊनही नव्या उमेदीने विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार करणाऱ्या माजी खासदार नवनीत राणा या ‘स्टार प्रचारक’ नेत्या मानल्या जात होत्या. त्यांना राज्यसभेत प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळेल, असा विश्वास त्यांच्या समर्थकांना होता, पण यावेळी त्यांना संधी नाकारण्यात आली आणि राणा समर्थकांना चांगलाच धक्का बसला.

नवनीत राणा यांची पोस्ट चर्चेत

नवनीत राणा यांना राज्यसभेची संधी न मिळाल्याने त्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली नसली, तरी त्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये समाज माध्यमांवर संवाद साधताना सूचक शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ताज्या पोस्टमधूनही त्यांनी भावनिक मुद्दे मांडले आहेत. या पोस्टची चांगलीच चर्चा रंगली आहे.

काय म्हणाल्या नवनीत राणा?

समाज माध्यमांवरील पोस्टमध्ये नवनीत राणा यांनी हिंदी भाषेतून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘कहते है ना, आपको हम जैसे हजारों मिलेंगे, पर उन हजारों मे हम नही मिलेंगे. ये कुछ एैसे लोगो के लिए है… समझदारों को इशारा काफी है.., असे त्यांनी म्हटले आहे. त्यांचा रोख कुणाकडे आहे, यावर आता राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. त्यांचा इशारा भाजपमधील किती लोकांना समजला, याचे आडाखे बांधले जात आहेत. नवनीत राणा या सध्या पक्षनेतृत्वावर नाराज असल्याचे बोलले जात असताना त्यांनी कोणत्या नेत्याकडे अंगुलीनिर्देश केला, यावर नेटकरी प्रतिक्रिया व्‍यक्‍त करीत आहेत.

यापूर्वीच्या पोस्टमधूनही नाराजी

नवनीत राणा यांनी यापुर्वी दोन वेळा समाज माध्यमांवर व्यक्त होत असताना आपल्या भावना मांडल्या आहेत. ‘संघर्ष करना मेरे लिए नई बात नही है, मै किसी भी मोड से नई शुरूवात कर सकती हूं’, असे गेल्या महिन्यातील एका पोस्टमध्ये सांगून त्यांनी भविष्यातील संघर्ष सूचित केला. राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने भावनिक झालेल्या नवनीत राणांनी संघर्ष ही माझ्यासाठी नवीन गोष्ट नाही, मी कुठल्याही वळणावरून नवीन सुरूवात करू शकते, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. एका पोस्टमध्ये त्यांनी ‘सरणारा प्रत्येक क्षण तुला हीच आठवण करून देत आहे, की तू यशस्वी झाला नाहीस, तर कोणीही तुझे नसते. तरीही मेहनत करा, निष्ठेने पुढे चला, प्रत्येक गोष्ट शक्य आहे, असे म्हटले होते.