नागपूर: भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा या नेहमीच त्यांच्या आक्रमक वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी एका वादग्रस्त विधान केले आहे. एका मुस्लिम मौलानाने केलेल्या वक्तव्याचा दाखला देत नवनीत राणा यांनी हिंदूंनी किमान ३ किंवा ४ मुले जन्माला घालावीत असे आवाहन केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी नवनवीन राणा यांच्या वक्तव्याचा निषेध करत दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा हा प्रकार असून दुसऱ्यांना उपदेश करण्यापेक्षा इतकेच असेल तर त्यांनी स्वत:च्या घरातून याची सुरुवात करावी, अशा शब्दात पलटवार केला.
काय म्हणाल्या होत्या नवनीत राणा?
अमरावती प्रसार माध्यमांशी संवाद साधताना नवनीत राणा म्हणाल्या, मौलाना सय्यद कादरी यांनी त्यांना ४ बायका आणि १९ मुले असल्याचं म्हटलं आहे. त्यांचा हिंदुस्थानाला पाकिस्तान बनवण्याचा आहे. ते लोक मोठ्या संख्येने मुले जन्माला घालत आहे. तर मग हिंदूंनी एका मुलावर संतुष्ट का व्हावे? त्यामुळे हिंदूंनी आता किमान चार मुले जन्माला घातली पाहिजे, असे अजब आवाहन नवनीत राणा यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
नवनीत राणा यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसेच्या युतीबाबतही भाष्य केले आहे. मजबुरीचे नाव जनाब उद्धव ठाकरे झाले आहे. नगरपरिषद नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये ते त्यांच्या कार्यकर्त्यासाठी बाहेर निघाले नाहीत, त्यांच्यासोबत कोणीही आले तरी, त्यांची परिस्थिती तशीच राहणार आहे. त्यांच्यासाठी नगरपरिषद नगरपंचायतच्या निवडणुकीपेक्षा वाईट निकाल मुंबईमध्ये लागणार आहेत. तसेच मुंबईत महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकेल, अशी अपेक्षाही नवनीत राणा यांनी व्यक्त केली.
प्यारे खान नेमके काय म्हणाले?
नवनीत राणा यांचे हे वयक्तिक विचार राहू शकतात. पण त्यांचा आरोप मुस्लिमांवर आहे. आता प्रत्येकाला परिवार आहे. त्यांना माहिती की, आपण काय करायला हवे आणि काय नाही. कारण प्रत्येकाला परिवार आहे. देशातील मुसलमान शिक्षित झाला आहे. आमच्या घरात मला दोन मुली आहेत. माझ्या मोठ्या भावाला एकच मुलगी आहे. वारंवार पाकिस्तानला जाण्याच्या गोष्टी करणेही योग्य नाही. जे अप्रामाणिक मुस्लीम होते ते पाकिस्तानात गेले. या देशातील मुस्लीम प्रामाणिक आहेत. ते शिक्षित आहेत. त्यामुळे त्यांनी आपला परिवार किती वाढवावा याची त्यांना जाणीव आहे. १९ मुले जन्माला घाला ही चुकीची गोष्ट आहे. असे कुणीही करत नाही. दुसऱ्यांना उपदेश देण्यापेक्षा त्यांनी स्वत:च्या घरातून सुरुवात करावी. देश विकासाकडे जात असताना असे वक्तव्य करून नवनीत राणा देशातील दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करत असल्याचा आरोपही प्यारे खान यांनी केला.
