अमरावती : महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. गेल्या वेळी ४५ जागा मिळाल्या होत्या, यावेळी केवळ २५ जागांवर समाधान मानावे लागले. या परिस्थितीसाठी जबाबदार कोण, यावर आता चर्चा सुरू झाली असताना भाजपच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनीही आपले स्पष्ट मत मांडण्यास सुरूवात केली आहे. भाजपच्या नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने या निवडणुकीत १५ जागा जिंकल्या. काही जागांवर युवा स्वाभिमानचा थेट भाजपसोबतच संघर्ष झाला. त्यामुळे भाजपला फटका बसल्याचे बोलले जात आहे.

भाजपचे पश्चिम विदर्भ समन्वयक आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रा. दिनेश सूर्यवंशी म्हणाले, भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्या भाजपच्या चेहरा आहेत. भाजपच्या हितासाठी त्या काम करतील, हे अपेक्षित आहे. त्यांचे पती रवी राणा यांचा युवा स्वाभिमान हा वेगळा पक्ष आहे. विशेषतत्वाने भाजपचा मित्र पक्ष आहे. युवा स्वाभिमान पक्षाचे निर्णय रवी राणा घेतील, पण या दोन पक्षातील सीमारेषा नवनीत राणा यांनी ओळखायला हवी.

यावेळी त्यांनी विलासनगर-मोरबाग प्रभागात एका जागेवर युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवाराचा उघडपणे प्रचार केल्याचे दिसले. हे टाळता येऊ शकले असते. नवनीत राणा या भाजपच्या स्टार प्रचारक आहेत. त्यांच्या वलयाचा उपयोग अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकला असता.

उमेदवारांच्या निवडीवरून असंतोष

भाजपचे माजी शहराध्यक्ष किरण पातुरकर म्हणाले, भाजपच्या कोअर कमिटीचा सदस्य असूनही उमेदवाराच्या निवडीच्या वेळी आम्हाला अंधारात ठेवले गेले. सुमारे ६०० च्या वर इच्छुकांनी उमेदवारी मागितली होती. ५२५ इच्छूकांमध्ये असंतोष होणार हे गृहीत धरून त्यांना सांभाळण्याची जबाबदारी ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांकडे सोपवायला हवी होती. आम्हाला निवडणुकीच्या रणनीतीच्या संदर्भातही विचारले गेले नाही. काही विशिष्ट लोकांनी दुसऱ्या पक्षातील राजकीय मित्राला फायदा पोहचावा, या हेतुने उमेदवारी मिळवून दिली. अशा परिस्थितीत भाजपचे नुकसान झाले. रवी राणा यांची भूमिका हिंदुत्ववादी आहे, त्यांना सोबत घेऊन चालणे कठीण नव्हते.

भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी म्हणाले, भाजपविषयी चांगले वातावरण असताना मित्रपक्षानेच भाजपच्या बालेकिल्ल्यात स्वतःला भाजपचे म्हणवत भाजपला हरवण्यासाठी कंबर कसली आणि त्यांना यश पण आले. तरीही सर्वात मोठा पक्ष म्हणून अमरावतीकर जनतेने कौल दिला आहे. याबद्दल अमरावतीकर जनतेचे आभार व्यक्त करतो.