गडचिरोली : नक्षलवाद्यांविरुद्धच्या लढाईत सुरक्षा दलांना नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मोठे यश मिळाले असून हिडमानंतर छत्तीसगडमधील नक्षली चळवळीचा कणा मानला जाणारा जहाल कमांडर बारसे देवा उर्फ सुक्का याने तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे.

दरभा डिव्हिजनल कमिटीचा सचिव असलेल्या देवावर शासनाने ५० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. कुख्यात नक्षलवादी माडवी हिडमाच्या खात्म्यानंतर नक्षल संघटनेची मोठी पीछेहाट झाली आहे.

काही दिवसांपूर्वी आंध्र प्रदेश पोलिसांनी केलेल्या कारवाईत जहाल नक्षलवादी माडवी हिडमा मारला गेला होता. हिडमाच्या मृत्यूमुळे नक्षली गटांमध्ये कमालीची अस्वस्थता आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तेव्हापासूनच बारसे देवा सुरक्षा दलांच्या रडारवर होता. केंद्र सरकारचे ‘ऑपरेशन कगार’ आणि पोलिसांचा वाढता दबाव यामुळे अखेर बारसे देवाने मध्यस्थांमार्फत चार राज्यांच्या पोलिसांशी संपर्क साधला आणि १ जानेवारी रोजी रात्री तेलंगणातील कोठगुडेम जिल्हा पोलिसांसमोर शरणागती पत्करली.

बारसे देवा हा मूळचा छत्तीसगडच्या पुवर्ती गावचा रहिवासी असून ‘पीएलजीए’च्या पहिल्या बटालियनचा कमांडर म्हणून त्याने अनेक वर्षे काम केले आहे. छत्तीसगडमध्ये सीआरपीएफ जवानांवर झालेल्या अनेक प्राणघातक हल्ल्यांमध्ये त्याचा थेट सहभाग होता. हिडमा सेंट्रल कमिटीत गेल्यानंतर त्याच्या सर्व जबाबदाऱ्या देवाने सांभाळल्या होत्या. नक्षलवादी चळवळीतील अंतर्गत माहिती आणि धोरणांचा तो मुख्य सूत्रधार असल्याने, त्याच्या आत्मसमर्पणानंतर चळवळीची अनेक गोपनीय माहिती पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षली नेतृत्वाला बसलेला हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.