गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या हिंसक विचारसरणीत आयुष्याची १३ वर्षे घालवल्यानंतर अखेर छत्तीसगडमधील ‘मोहला-मानपूर-अंबागड चौकी’ या जिल्ह्यातील शेवटची सक्रिय कॅडर कमांडर उर्मिला ऊर्फ टेटकी (२८) हिने २४ एप्रिल रोजी पोलिसांसमोर शरणागती पत्करली. उर्मिलाच्या या निर्णयामुळे नक्षली चळवळीला मोठा धक्का बसला असून, २०२२ मध्ये निर्माण झालेला हा जिल्हा आता अधिकृतपणे ‘नक्षलवादमुक्त’ झाला आहे.

मूळची मानपूर तालुक्यातील मुंजाल गावची असलेली उर्मिला अवघ्या १५ व्या वर्षी जंकू नावाच्या जहाल नक्षल्याच्या संपर्कात आली होती. कोवळ्या वयात तिचे ‘ब्रेनवॉश’ करून तिला बस्तरमधील कोयालीबेडा भागात सशस्त्र संघटनेत भरती करण्यात आले. गेल्या १३ वर्षांत ती शस्त्र हाताळण्यापासून ते घातपाती कारवायांपर्यंत निष्णात झाली होती. रावघाट एरिया कमिटीमध्ये ती कमांडर पदावर सक्रिय होती आणि तिच्यावर शासनाने ५ लाखाचे बक्षीस जाहीर केले होते.

मृत्यूला चकवा देत थरारक प्रवास

उर्मिलाचा संघटनेतून बाहेर पडण्याचा प्रवास एखाद्या थरारपटासारखा होता. काही दिवसांपूर्वी तिने कोणालाही सुगावा लागू न देता शस्त्रे तिथेच टाकून दलम सोडले. बस्तरच्या घनदाट जंगलातून एकटीने पायी प्रवास करत तिने मानपूर गाठले. एका बाजूला सुरक्षा दलांची गस्त आणि दुसरीकडे संघटनेकडून जिवाला असलेला धोका, अशा दुहेरी कात्रीत मृत्यूला चकवा देत तिने जिल्हा मुख्यालय गाठून पोलीस अधीक्षक कार्यालयात शरणागती पत्करली.

जहाल चंदर अद्याप सक्रिय

शरणागतीनंतर झालेल्या चौकशीत उर्मिलाने अनेक महत्त्वाची माहिती पोलिसांना दिली आहे. सुमारे दीड महिन्यापूर्वी तिची भेट जहाल नक्षली चंदर आणि रुपी यांच्याशी झाली होती. एका चकमकीत रुपी मारली गेली, मात्र चंदर अजूनही १० ते १२ साथीदारांसह बस्तरच्या दुर्गम भागात सक्रिय असल्याची माहिती तिने दिली. या माहितीनंतर सुरक्षा यंत्रणांनी आपली मोहीम अधिक तीव्र केली आहे.

शासनाची पुनर्वसन धोरण आणि पोलीस प्रशासनाचा वाढता दबाव यामुळे नक्षल्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे. उर्मिलाच्या शरणागतीमुळे या भागातील नक्षलवाद्यांचे जाळे पूर्णपणे खिळखिळे झाले असून, जिल्हा आता नक्षलमुक्त झाला आहे. असे छत्तीसगड पोलीस प्रशासनाने सांगितले आहे.