नागपूर : नक्षलवादाच्या सावटामुळे दशकानुदशके अभेद्य राहिलेली अबूझमाड-इंद्रावतीची जंगले आता खुली होत आहेत. मात्र, या यशानंतर निर्माण झालेल्या या नव्या वास्तवासोबतच देशातील महत्त्वाच्या व्याघ्र कॉरिडॉरवर शिकारी आणि वन्यजीव तस्करांची नजर लागण्याचा धोका वाढला आहे. या क्षेत्रात नियमित व प्रभावी गस्त घातली गेली नाही, तर वाघांचा हा स्थलांतर मार्ग वन्यजीव गुन्हेगारांसाठी नवे आश्रयस्थान ठरू शकतो.

वाघांसाठी हा महत्त्वाचा कॉरिडॉर

गडचिरोली-इंद्रावती-उदंती सीतानदी ही राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने मान्य केलेली महत्त्वाची व्याघ्र मार्गिका आहे. महाराष्ट्रात सुमारे ५०० तर छत्तीसगडमध्ये सुमारे २० वाघ आहेत. या दोन्ही राज्याला जोडणाऱ्या या मार्गिकेतून वाघांचे स्थलांतर सातत्याने सुरू आहे. उदंती-सीतानदी हा व्याघ्रप्रकल्प वाघविरहीत होता, पण आता वाघांचे वास्तव्य दिसू लागले आहे. या क्षेत्रात अनेक वाघांची अधिकृत नोंद नसल्याने त्यांच्या हालचालीवर नजर ठेवणे कठीण आहे. परिणामी वाघांच्या शिकारीचा धोका अधिक आहे. भामरागड, एटापल्ली, आलापल्ली आणि सीमेलगतच्या बिजापूर परिसरात हीच स्थिती आहे. महाराष्ट्रात वाघांची संख्या वाढल्याने त्यांचे नवीन अधिवासांच्या शोधात स्थलांतर वाढले. स्थलांतराच्या या टप्प्यात वाघ सर्वाधिक असुरक्षित असतात.

शिकारी टोळ्या व तस्कर सक्रिय

दुसरीकडे राज्यात काही शिकारी टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्याचे तपास यंत्रणांच्या कारवाईतून समोर आले. महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील दोन पोलीस खात्यातील कर्मचारी तस्करीत पकडल्यामुळे या मार्गिकेवर आता गस्त अधिक महत्त्वाची आहे. वाघांच्या या मार्गिकेत प्रत्येक एक-दोन किलोमीटरवर वाघांसाठी सापळे लावले जात आहेत. मात्र, वाघांसाठी लावलेले हे सापळे वाघांसह इतर वन्यप्राण्यांसाठीही घातक ठरत आहेत. वन्यजीव अवयवांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत असलेली मागणी लक्षात घेता इंद्रावती नदीमार्गे तस्करीची मोठी शक्यता आहे. हे क्षेत्र नक्षलमुक्त झाल्यानंतर निर्माण झालेली ही पोकळी तातडीने भरून काढली नाही, तर देशातील सर्वांत महत्त्वाच्या व्याघ्र मार्गिकेपैकी एक असलेल्या या पट्ट्यावर शिकारी आणि तस्करांचे सावट अधिक गडद होण्याची भीती आहे.

उपसंचालक वरूण जैन सांगतात…

गडचिरोली, विजापूर आणि अबूझमाड हा सुमारे दहा हजार चौरस किलोमीटरचा परिसर आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प, उदंती-सीतानदी व्याघ्रप्रकल्प आणि पेंच व्याघ्रप्रकल्प यांच्या एकत्रित क्षेत्राच्या तो पाचपट आहे. हे क्षेत्र आता नक्षलमुक्त झाले असले तरी नियमित गस्त आवश्यक आहे. महाराष्ट्रात अतिरिक्त वाघ आहेत तर छत्तीसगडमध्ये वाघांची संख्या अतिशय कमी आहे. या दोन राज्यांना जोडणारी मार्गिका सुरक्षीत राहिली तरच वाघांचे यशस्वी स्थलांतर होऊ शकेल. नाही तर वाघांच्या शिकारीचा धोका टाळता येणार नाही. वाघांच्या अवयवांना मोठी मागणी आहे आणि या मार्गिकेतून तस्करीसाठी इंद्रावती हा सहजसोपा मार्ग आहे, असे उदंती-सीतानदी व्याघ्रप्रकल्पचे उपसंचालक वरुण जैन म्हणाले.

हत्तींसाठी सुरक्षित आश्रयस्थान

ओडिशात हत्तींची संख्या वाढली आणि खाणींमुळे या हत्तींचे स्थलांतर सुरू झाले. सुरुवातीला हे हत्ती छत्तीसगडमध्ये आले आणि आता राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने मान्य केलेल्या याच मार्गिकेचा वापर करुन ते महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाले. गेल्या काही वर्षात ते याच जिल्ह्यात स्थिरावले आहेत. नियमित गस्तीने हे क्षेत्र सुरक्षित झाले, तर भविष्यात ते हत्तींसाठी सुरक्षित आश्रयस्थान ठरू शकेल.