गडचिरोली : कुख्यात नक्षल नेता माडवी हिडमासह पंधरा जणांना आंध्रप्रदेश पोलिसांनी बनावट चकमकीत ठार केल्याचा आरोप नक्षल संघटनेने केला आहे. हिडमाचा मृत्यूनंतर पहिल्यांदाच नक्षल्यांच्या केंद्रीय समितीने अभयच्या नावाने प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे.
या पत्रकात संघटनेने केलेल्या दाव्यानुसार, हिडमा आणि त्याचे काही सहकारी उपचारासाठी विजयवाडा शहरात गेले होते. मात्र, काही जवळच्या लोकांनी ही बाब सुरक्षा दलाला कळवली. यावरून आंध्र प्रदेश पोलिसांनी त्यांना १५ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेतले. १८ नोव्हेंबरला सर्वांना ठार करून मारेदुमिल्लीच्या जंगलात चकमक झाल्याची खोटी कहाणी रचण्यात आली.
पोलिसांनी काही शस्त्रही जप्त केल्याचा दावा केला. हे सर्व बनावट असल्याचा आरोप नक्षल्यांनी केला आहे. दुसऱ्या दिवशी दाखवण्यात आलेली चकमकही खोटी असल्याचा दावा पत्रकात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी आधीच या आरोपांचे खंडण केले आहे.
समाज माध्यमावर समर्थनाचे वारे
नक्षल संघटनेने पत्रकामध्ये हिडमाच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीचा उल्लेख करीत श्रद्धांजली वाहिली. सोबतच त्याला क्रांतिकारी असे संबोधण्यात आले आहे. दुसरीकडे हिडमाच्या मृत्यूनंतर आंध्रप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि महाराष्ट्र सीमा भागामध्ये समाज माध्यमावर हिडमाबद्दल सहानुभूती दर्शवणारे लिखाण आणि ‘पोस्ट’ची लाट पाहायला मिळत आहे.
नक्षल नेत्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यसंस्काराला आंध्र प्रदेश व तेलंगणामध्ये मोठी गर्दी उसळल्याचे बऱ्याचदा समोर आले आहे. पण इतक्या मोठ्या प्रमाणात समाज माध्यमावर जाहीर समर्थन पहिल्यांदाच बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे हिडमाच्या अंत्ययात्रेलाही मोठी गर्दी झाली होती.
देवजीबद्दल मौन
आंध्र प्रदेशातील मारेदुमिल्ली जंगलात मंगळवारी आणि बुधवारी झालेल्या चकमकीत ‘पीएलजीए’चा कमांडर माडवी हिडमा याच्यासह १५ नक्षवादी ठार झाले. तर ५० हून अधिक नक्षल्यांना अटक करण्यात आली. यात सर्वोच्च नक्षल नेता थिप्पीरी तिरुपती ऊर्फ देवजी याच्या अंगरक्षकांचा समावेश आहे. मात्र, अद्याप देवजीचा थांगपत्ता न लागल्याने त्याच्या कुटुंबीयांनी आंध्र प्रदेश पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. मात्र, नक्षल संघटनेने जारी केलेल्या पत्रकात देवजीबद्दल मौन बाळगण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
