गडचिरोली : छत्तीसगड आणि महाराष्ट्रात वरिष्ठ नक्षलवादी नेत्यांसह मोठ्या संख्येने कॅडरच्या आत्मसमर्पणाची मालिका सुरू असतानाच, गेली ४५ वर्षे नक्षलवादी चळवळीत सक्रिय असलेला वरिष्ठ नक्षल नेता आणि तेलंगणा राज्य समिती सदस्य बंडी प्रकाश उर्फ प्रभात याने मंगळवारी तेलंगणा पोलिसांसमोर शरणागती पत्करली. त्यांनी तेलंगणाचे पोलीस महासंचालक बी. शिवधर रेड्डी यांच्यासमोर आत्मसमर्पण केले. त्याच्यावर विविध राज्यात मिळून दीड कोटींचे बक्षीस होते.
बंडी प्रकाश गेल्या ४५ वर्षांपासून माओवादी संघटनेत सक्रिय होता. आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील विविध व्यावसायिक स्त्रोतांकडून संघटनेसाठी निधी गोळा करण्यात त्याची प्रमुख भूमिका होती. त्याचे आत्मसमर्पण हे माओवादी कारवाया संपवण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या सरकारी मोहिमेचे एक मोठे यश मानले जात आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या मध्यातच महाराष्ट्रातील गडचिरोली येथे नक्षलवाद्यांचा सर्वोच्च नेता आणि पॉलिट ब्युरो सदस्य मल्लोझुला वेणुगोपाल राव उर्फ भूपती याने तब्बल ६० सहकाऱ्यांसह मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले होते. या घटनेने संपूर्ण ‘रेड कॉरिडॉर’ हादरला होता.
त्यापाठोपाठ, १७ ऑक्टोबर रोजी छत्तीसगडमधील बस्तर येथे एकाच दिवशी तब्बल २१० नक्षलवाद्यांनी भारतीय संविधानाची शपथ घेत शरणागती पत्करली होती. यात केंद्रीय समितीचा सदस्य रुपेश याचाही समावेश होता. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांपूर्वी, २६ ऑक्टोबर रोजी, छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात १३ महिलांसह २१ वरिष्ठ नक्षलवादी कॅडरने एके-४७ सारख्या अत्याधुनिक शस्त्रांसह आत्मसमर्पण केले.
या पार्श्वभूमीवर, तेलंगणातील बंडी प्रकाश याची शरणागती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंदी प्रकाश याने नक्षलवादी संघटनेत अनेक प्रमुख पदावर काम केले आहे. शरणागती पत्करण्यापूर्वी तो ‘नॅशनल पार्क एरिया ऑर्गनायझर’ म्हणून कार्यरत होता. नक्षलवादी चळवळीत एक अत्यंत महत्त्वाचे पद मानले जाते.
भूमिगत होण्यापूर्वी, बंडी प्रकाश कामगार संघटनांमध्ये कार्यरत होता. त्याने सिंगरेनी वर्कर्स युनियनचे अध्यक्षपदावर काम केले होते. या कामगार संघटनेचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे मानले जाते. छत्तीसगड, महाराष्ट्र आणि आता तेलंगणा या तिन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागात वरिष्ठ नेत्यांनी आणि मोठ्या संख्येने कॅडरने एकापाठोपाठ पत्करलेली शरणागती नक्षल मुक्तीच्या दिशेने महत्वाचे पाऊल मानले जात आहे.
