गडचिरोली : कधीकाळी हातात बंदूक घेऊन जंगलात वावरणारे हात आता आदिवासी ग्रामस्थांच्या हक्कांसाठी कागदपत्रे हाताळणार आहेत. नक्षलवादी चळवळीतील प्रमुख नेता म्हणून ओळखले जाणारे मल्लोजुला वेणुगोपाल राव ऊर्फ भूपती यांनी शस्त्राचा मार्ग सोडल्यानंतर त्यांच्या आयुष्याला आता नवी दिशा मिळाली आहे. गोंडवाना विद्यापीठाने त्यांची ‘एकल’ उपक्रमात समन्वयक म्हणून नियुक्ती केली असून, ग्रामसभा आणि आदिवासींना त्यांच्या कायदेशीर हक्कांसाठी मार्गदर्शन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

भूपती यांनी ऑक्टोबर २०२५ मध्ये गडचिरोली येथे ६१ सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण केले होते. अनेक वर्षे जंगलातील नक्षलवादी चळवळीत सक्रिय राहिल्यानंतर त्यांनी मुख्य प्रवाहात परतण्याचा निर्णय घेतला. आता त्याच जंगलातील आदिवासींच्या प्रश्नांसाठी, मात्र पूर्णपणे वेगळ्या भूमिकेतून, काम करण्याची संधी त्यांना मिळाली आहे.

गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी भूपती यांना आदिवासी समाजाच्या प्रश्नांची असलेली जाण आणि प्रत्यक्ष अनुभव लक्षात घेऊन त्यांचे नाव विद्यापीठाकडे सुचविले. भूपती यांची नियुक्ती तीन महिन्यांच्या करारावर करण्यात आली असून, त्यांना दरमहा ३० हजार रुपये मानधन मिळणार आहे.

‘एकल’ उपक्रमांतर्गत ग्रामसभांना पेसा कायदा आणि वनहक्क कायद्यानुसार असलेल्या अधिकारांची माहिती देणे, वनहक्कांचे दावे दाखल करताना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यास मदत करणे, दाव्यांमधील त्रुटी दूर करून ते प्रशासनाकडे सादर करण्यासाठी समन्वय साधणे, अशी त्यांची भूमिका असेल.

ग्रामसभा, ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यातील दुवा म्हणूनही भूपती काम करतील. विशेष म्हणजे, ज्या आदिवासी भागातील प्रश्नांना ते पूर्वी एका वेगळ्या भूमिकेतून पाहत होते, त्याच भागातील नागरिकांना आता कायदेशीर मार्गाने त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. त्यांच्या नियुक्तीला गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रशांत बोकारे यांनी दुजोरा दिला आहे.

गोंडवाना विद्यापीठाच्या ‘एकल’ उपक्रमांतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील १,१४९ पैकी ५३२ ग्रामसभांचे सक्षमीकरण करण्यात आले आहे. बंदुकीच्या मार्गावरून लोकशाहीच्या मार्गावर आलेल्या भूपतींसाठी ही केवळ नोकरी नसून, भूतकाळातून वर्तमानाकडे आणि संघर्षातून समाजसेवेच्या वाटेवर झालेला एक महत्त्वाचा प्रवास ठरणार आहे.