गडचिरोली: गेल्या चार दशकांपासून नक्षलवादी चळवळीवर असलेले तेलंगणा कॅडरचे निर्विवाद वर्चस्व आता पूर्णपणे मोडीत निघाल्याचे चित्र असून, संघटनेत इतिहासातील सर्वात मोठे नेतृत्व संकट उभे ठाकले आहे. तेलंगणा लॉबीचे कणा मानले जाणारे थिप्पिरी तिरुपती ऊर्फ ‘देवजी’ आणि मल्लाराजी रेड्डी ऊर्फ ‘संग्राम’ या दोन बड्या नेत्यांनी तेलंगणा पोलिसांसमोर शरणागती पत्करल्याने नक्षलवाद्यांचा ‘रिमोट कंट्रोल’ निखळला आहे. या पार्श्वभूमीवर, आता संघटनेची धुरा झारखंडचा रहिवासी असलेला पॉलीट ब्युरो आणि केंद्रीय समिती सदस्य कुख्यात मिशीर बेसराकडे जाणार की उर्वरित फळीही शस्त्रे म्यान करणार, याकडे सुरक्षा यंत्रणांचे लक्ष लागले आहे.
नक्षलवादी संघटनेत आजवर तेलंगणा कॅडरचा दबदबा राहिला असून हिंसक कारवायांची रणनीती याच गटाकडून आखली जात असे. देवजी हा अनौपचारिकपणे सरचिटणीसपदाची जबाबदारी सांभाळत होता, मात्र त्याच्या शरणागतीमुळे तेलंगणा कॅडरचा ४० वर्षांचा वरचष्मा संपला आहे. २०२५ हे वर्ष नक्षलवाद्यांसाठी अत्यंत विनाशकारी ठरले असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मार्च २०२६ पर्यंत माओवाद संपवण्याचा जो निर्धार व्यक्त केला आहे, त्याचे परिणाम जमिनीवर दिसू लागले आहेत. गेल्या वर्षभरात ठार झालेल्या १० प्रमुख नक्षली नेत्यांपैकी ७ जण तेलंगणा कॅडरचे होते, ज्यामध्ये बसवा राजू, गुड्सा उसेंडी आणि जयराम यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. ८० वर्षीय गणपती प्रकृती अस्वस्थामुळे अज्ञातवासात आहे. या नेतृत्वाच्या पोकळीमुळे आता पहिल्यांदाच तेलंगणाबाहेरचा नेता, म्हणजेच झारखंडचा मिशीर बेसरा संघटनेची सूत्रे हाती घेण्याची शक्यता गुप्तचर अहवालात वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, छत्तीसगड आणि ओडिशा सीमेवर सक्रिय असलेल्या ‘बीबीएम’ डिव्हिजननेही आता सामूहिक शरणागतीचे संकेत दिले आहेत. या विभागाच्या १५ सदस्यांनी छत्तीसगडचे गृहमंत्री विजय शर्मा यांना पत्र लिहून सशस्त्र संघर्ष सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एकीकडे ही संघटनात्मक पडझड सुरू असतानाच, बीजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी पेरलेल्या प्रेशर आयईडीच्या स्फोटात एसटीएफचा जवान गंभीर जखमी झाला होता. याचदरम्यान चकमकीत दोन नक्षल्यांना ठार करण्यात आले. नक्षलमुक्तीची ‘डेडलाईन’ संपायला आता केवळ ३० दिवस शिल्लक असल्याने मार्च महिन्यात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
मिशीर बेसरा कोण आहे?
मिशीर बेसरा (६४) हा ‘सागर’ या नावाने ओळखला जाणारा भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माओवादी) या प्रतिबंधित संघटनेचा वरिष्ठ आणि जहाल नक्षलवादी नेता आहे. तो या संघटनेच्या सर्वोच्च निर्णय घेणाऱ्या ‘सेंट्रल कमिटी’ आणि ‘पॉलीट ब्युरो’चा सदस्य असून, प्रामुख्याने झारखंडमधील सारंडा जंगल आणि ओडिसा-छत्तीसगडच्या सीमावर्ती भागात नक्षलवादी कारवायांचे नेतृत्व करतो. २००७ मध्ये त्याला अटक करण्यात आली होती. मात्र, पुराव्या अभावी २००९ साली त्याची सुटका झाली. तुरुंगातून सुटल्यानंतर तो पुन्हा भूमिगत झाला आणि त्याने चळवळीची धुरा सांभाळली.
सध्या तो सुरक्षा दलांच्या ‘मोस्ट वॉन्टेड’ यादीत असून झारखंड सरकारने त्याच्यावर १ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. त्याच्यावर सुरक्षा दलांवरील हल्ले, आयईडी स्फोट आणि देशद्रोहाचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. सध्याच्या घडीला बेसरा हा झारखंड, छत्तीसगड आणि ओडीशा सीमा भागात आपल्या ५० सशस्त्र कॅडरसह सक्रिय असून तो एकमेव सक्रिय नेता आहे.
