गडचिरोली : प्रतिबंधित सीपीआय (माओवादी ) संघटनेचा सर्वोच्च रणनीतीकार, पॉलिट ब्युरो सदस्य आणि देशातील नक्षलवादी चळवळीचा आधारस्तंभ मानला जाणारा जहाल नक्षलवादी नेता प्रशांत बोस उर्फ किशन दा (८०) याचा शुक्रवारी मृत्यू झाला. रांची येथील राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये (रिम्स) उपचार सुरू असताना त्याने अखेरचा श्वास घेतला.
नक्षलवादी संघटनेत महासचिव नंबाला केशव राव यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे स्थान भूषवणाऱ्या बोसच्या निधनामुळे या देशविघातक चळवळीला मोठा हादरा बसला असून, खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्र, छत्तीसगड आणि झारखंडच्या सीमावर्ती भागात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तुरुंगात प्रकृती खालावली
सरायकेला येथील तुरुंगात न्यायालयीन कोठडीत असलेल्या बोसची प्रकृती ३ एप्रिल रोजी पहाटे अचानक बिघडली. त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने सकाळी ६ वाजता कडक पोलीस बंदोबस्तात रांचीच्या ‘रिम्स’ रुग्णालयात दाखल करण्यात आले. वाढते वय आणि फुफ्फुसांच्या गंभीर आजारामुळे उपचारांना प्रतिसाद मिळाला नाही आणि सकाळी १० च्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.
अनेक राज्यांत होती दहशत
मूळचा पश्चिम बंगालचा असलेला प्रशांत बोस हा नक्षलवाद्यांचा मुख्य विचारवंत (थिंक टँक) मानला जात असे. दंडकारण्यातील गनिमी काव्यापासून ते शहरी नक्षलवादाचे जाळे विणण्यापर्यंत सर्व महत्त्वाच्या निर्णयांत त्याचा सक्रिय सहभाग होता. महाराष्ट्र, छत्तीसगड, झारखंड, बिहार आणि ओडिशा या राज्यांत झालेल्या २०० हून अधिक हिंसक कारवायांमध्ये त्याचा थेट हात होता. २०२१ मध्ये दिवाळीच्या दिवशी पोलीस कॅम्पवर झालेल्या हल्ल्याचा कट बोसनेच रचला होता, ज्यात १५ जवान शहीद झाले होते.
अखेरच्या काळात बेड्या
अनेक दशके सुरक्षा यंत्रणांना गुंगारा देणाऱ्या प्रशांत बोसला १२ नोव्हेंबर २०२१ रोजी सरायकेला-खरसावा जिल्ह्यातून अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्याच्यावर १ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर होते. त्याच्यासोबत त्याची पत्नी आणि नक्षलवादी नेत्या शीला मरांडी हिलाही अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो तुरुंगातच होता.
नक्षलग्रस्त भागात सुरक्षा वाढवली
बोसच्या मृत्यूमुळे नक्षलवादी समर्थकांकडून हिंसक प्रतिक्रिया उमटण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये सुरक्षा दल आणि सीआरपीएफला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रुग्णालयात दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कायदेशीर सोपस्कार पार पाडले जात असून, शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
