गडचिरोली : चार दशकाहून अधिक काळ सशस्त्र हिंसक संघर्ष करणारे नक्षल नेते ‘सीपीएमएल लिबरेशन’ पक्षाच्या संपर्कात असून ३१ मार्चनंतर ते सक्रिय राजकारणात प्रवेश करणार असल्याची दाट शक्यता गुप्तचर विभागातील उच्चपदस्थ सूत्रांनी वर्तवली आहे. नक्षल संघटनेतील अत्यंत प्रभावशाली आणि ‘पॉलिट ब्युरो’चे सदस्य मल्लोजुला वेणूगोपाल उर्फ सोनू उर्फ भूपती, थिप्पीरी तिरुपती उर्फ देवजी आणि पुल्लूरी प्रसादराव उर्फ चंद्रन्ना या तिन्ही बड्या नेत्यांनी आत्मसमर्पणानंतर आम्ही केवळ शस्त्रे सोडली आहेत, आमची राजकीय विचारधारा नाही.

हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सुरक्षा यंत्रणांचे लक्ष लागून आहे.१९६७ साली पश्चिम बंगालमधील नक्षलबारी येथे झालेल्या सशस्त्र उठावानंतर नक्षल चळवळीचे संस्थापक कारू सान्याल आणि चारू मुजुमदार यांनी १९६९ मध्येच सीपीआय (एम) मधून वेगळे होत भारतीय कम्युनिस्ट पार्टी ( मार्कसिस्ट -लेनीनिस्ट) स्थापना केली होती. १९७२ रोजी पोलीस कोठडी चारू मुदुमदार यांचा मृत्यू झाल्यानंतर हा पक्ष अनेक गटात विभागला गेला.

त्यानंतर १९७४ साली विनोद मिश्रा यांच्या नेतृत्वात ‘सीपीएमएल लिबरेशन’ची स्थापना करण्यात आली. १९८० च्या सुमारास या पक्षाने सशस्त्र संघर्ष सोडून लोकशाही मार्ग स्वीकारला. सीपीएमएल लिबरेशन’ हा पक्ष मूळचा जहाल डाव्या चळवळीतूनच उदयास आला असला, तरी गेल्या काही वर्षांत या पक्षाने लोकशाही मार्गाने निवडणुका लढवून आपली ताकद सिद्ध केली आहे. विशेषतः बिहार विधानसभा निवडणुकीत २०२० मध्ये १२ जागा जिंकून या पक्षाने प्रस्थापित राजकारण्यांना धक्का दिला होता.

आजच्या घडीला हा पक्ष इंडिया आघाडीचा सदस्य असून बिहार आणि झारखंडमध्ये त्यांचे प्रत्येकी दोन आमदार व दोन खासदारही निवडून आले. गृहमंत्र्यांनी ३१ मार्चपूर्वी देश नक्षलमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्या पार्श्वभूमीवर नक्षल्यांचे मोठ्या प्रमाणात आत्मसमर्पण सुरू आहे. सोनू, देवजी आणि चंद्रन्ना यांसारखे संघटनात्मक कौशल्य असलेले अनुभवी नेते जर या पक्षात सामील झाले, तर तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील राजकीय समीकरणे बदलू शकतात.

या नेत्यांचा असलेला जनसंपर्क आणि दुर्गम भागातील पकड पाहता, ‘लिबरेशन’ला दक्षिण भारतात आपले पाय रोवण्यासाठी या मोठ्या नावांचा फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दिग्गज माजी नक्षल नेत्यांची पुढची राजकीय खेळी नेमकी काय असेल, याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.