गडचिरोली : नक्षलवादाच्या विरोधात सुरक्षा दलांनी पुकारलेल्या निर्णायक लढ्याला सोमवारी पहाटे आणखी एक मोठे यश आले. महाराष्ट्र-छत्तीसगड सीमावर्ती भागातील नक्षलवाद्यांचे सुरक्षित आश्रयस्थान मानल्या जाणाऱ्या माचपल्लीच्या घनदाट जंगलात झालेल्या चकमकीत जहाल नक्षलवादी रंगाबोईना भाग्या ऊर्फ रुपी रेड्डी (वय ४५) ही ठार झाली. पाच लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या रुपीच्या खातम्यामुळे उत्तर बस्तरमधील नक्षली चळवळीला मोठा हादरा बसला असून, तेलंगणा कॅडरचा छत्तीसगडमधील शेवटचा दुवा निखळला आहे.

गडचिरोलीला लागून असलेल्या परिसरात चकमक

कांकेर जिल्ह्यातील छोटेबेठिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत नक्षलवाद्यांच्या हालचाली वाढल्याची गोपनीय माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे जिल्हा पोलीस दल आणि सीमा सुरक्षा दलाच्या संयुक्त तुकडीने रविवारी रात्रीपासूनच या भागात नक्षलविरोधी अभियान तीव्र केले होते. सोमवारी पहाटे ४ च्या सुमारास माचपल्लीच्या जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांशी पोलिसांचा आमनासामना झाला. यावेळी नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार सुरू केला, मात्र सुरक्षा दलांनी दिलेल्या चोख प्रत्युत्तरामुळे नक्षल्यांची दाणादाण उडाली. पोलिसांचा वाढता दबाव पाहून अनेक नक्षलवादी घनदाट जंगलाचा फायदा घेत पसार झाले. सकाळच्या सुमारास जेव्हा परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली, तेव्हा एका महिला नक्षलवाद्याचा मृतदेह आणि जवळच एक अत्याधुनिक स्वयंचलित रायफल आढळून आली. तपासणीअंती ही मृत नक्षली जहाल नेत्या रुपी रेड्डी असल्याचे निष्पन्न झाले.

तेलंगणा कॅडरचा छत्तीसगडमधील शेवटचा दुवा

मूळची तेलंगणा राज्यातील रहिवासी असलेली रुपी रेड्डी ही २००४ पासून नक्षल चळवळीत सक्रिय होती. ती माड डिव्हिजनची विभागीय समिती सदस्य आणि परतापूर क्षेत्रीय समितीची महत्त्वाची सूत्रधार म्हणून कार्यरत होती. विशेष म्हणजे, छत्तीसगड राज्यातील जहाल नक्षलवादी तथा स्पेशल झोनल कमिटी मेंबर सुगुलुरी चिन्नाना ऊर्फ विजय रेड्डी याची ती पत्नी होती. विजय रेड्डी १३ ऑगस्ट २०२५ रोजी मोहल्ला-मानपूर चकमकीत ठार झाला होता. पतीच्या मृत्यूनंतरही रुपीने शस्त्र खाली न ठेवता चळवळ सुरूच ठेवली होती.

आत्मसमर्पणास नकार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत देशातील नक्षलवाद समूळ नष्ट करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर, छत्तीसगड, तेलंगणा आणि महाराष्ट्रातील अनेक जहाल नक्षल्यांनी आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात येणे पसंत केले. मात्र, रुपी रेड्डीने आत्मसमर्पणाचा मार्ग नाकारला होता. केवळ स्वतःच नव्हे, तर बस्तरमधील तरुण कॅडरलाही ती आत्मसमर्पण करण्यापासून परावृत्त करत होती. तिच्या या टोकाच्या भूमिकेमुळे ती सुरक्षा दलांच्या रडारवर होती. अखेर या चकमकीत तिचा अंत झाला असून, सीमावर्ती भागातील नक्षलवादी चळवळीचे कंबरडे मोडले आहे.