गडचिरोली : छत्तीसगडमध्ये नक्षलवादविरोधी मोहिमेला आणखी एक मोठे यश मिळाले आहे. मागील तीस वर्षांपासून गूढ बनून राहिलेला आणि नक्षलवादी संघटनांच्या दुसऱ्या फळीतील पाच हजारहून अधिक नक्षल्यांना प्रशिक्षण देणारा नक्षलवाद्यांचा प्रशिक्षक रामधेरने पत्नी अनिता व १० सहकाऱ्यांसह अखेर छत्तीसगड पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. त्याच्यावर विविध राज्यात मिळून ३ कोटींचे बक्षीस होते.

एकेकाळची श्रीलंकेतील दहशतवादी संघटना ‘एलटीटीई’कडून प्रशिक्षण घेतलेला जहाल नक्षल नेता आणि अनेक वरिष्ठ नेत्यांचा मार्गदर्शक असलेला ५४ वर्षीय रामधेर हा बस्तरमधील बिजापूर येथील भैरमगडचा रहिवासी आहे. गावात त्याला ‘मज्जीदेव’ म्हणून ओळखले जाते. ३५ वर्षांपूर्वी केंद्रीय समिती सदस्य मुप्पला लक्ष्मण राव उर्फ गणपती याने त्याला संघटनेत भरती केले होते. परंतु, रामधेरला अधिक जहाल बनवले ते त्याने आत्मसात केलेल्या ‘गुरील्ला’ युद्ध कौशल्याने.

सूत्रांनुसार, २००० ते २००५ दरम्यान, श्रीलंकेतील लिट्टे (लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम) संघटनेतील काही सदस्य भारतात पळून आले होते. याच काळात, लिट्टेच्या दहशतवाद्यांनी बस्तरच्या जंगलात सीपीआय (माओवादी) गटाला विशेष गनिमी युद्ध आणि आयईडी बनवण्याचे प्रशिक्षण दिले. या तुकडीतील रामधेर हा सर्वात सक्रिय सदस्य होता. त्याने केवळ प्रशिक्षण घेतले नाही, तर नक्षलवाद्यांना शस्त्रास्त्रांचा पुरवठा आणि अद्ययावत प्रशिक्षणासाठी तो स्वतः श्रीलंकेलाही गेला होता. तेथूनच त्याने ‘यूबीजीएल’ सारखी लहान शस्त्रे बनवण्याचे कौशल्यही आत्मसात केले.
हिडमासह ५ हजार नक्षलवाद्यांना तयार केले.

रामधेरची कार्यशैली अत्यंत धूर्त होती. त्याला प्रसिद्धी आवडत नव्हती, त्यामुळे नक्षलवाद जवळजवळ संपुष्टात येईपर्यंत त्याने आपली ओळख गुप्त ठेवली. त्याचे मुख्य कार्य नक्षलवादी लष्करी आयोगाचे सचिव म्हणून संघटनेसाठी नवीन लढवय्ये तयार करणे हे होते. त्याने तब्बल वीस वर्षे या लष्करी आयोगाला कठोर प्रशिक्षण दिले.

रामधेरच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये नुकताच ठार झालेला नक्षलवादी नेता हिडमा आणि सक्रिय असलेला देवा यांसारख्या अनेक क्रूर नेत्यांचा समावेश आहे. त्याने छत्तीसगड, महाराष्ट्र, मध्य प्रदेशसह सहा राज्यांतील नक्षलवादी कंपन्या आणि प्लाटूनमधील ५ हजारहून अधिक सशस्त्र नक्षलवाद्यांना गनिमी हल्ला, आयईडी तयार करण्याची आणि सुरक्षा दलांवर घातपात करण्याची पद्धत शिकवली. नक्षलवाद्यांसाठी शस्त्रास्त्रे आणि लपण्यासाठी भूमिगत बोगदे खोदण्याची कल्पना देखील रामधेरचीच होती.

सहा महिन्यांत एमएमसी झोन नक्षलमुक्त

नोव्हेंबर २०२१ मध्ये मिलिंद तेलतुंबडे चकमकीत मारला गेल्यानंतर ‘एमएमसी’ झोनमधील नक्षलवाद्यांची संख्या कमकुवत झाली होती. एप्रिल २०२३ मध्ये संघटनेने या भागाला बळकटी देण्यासाठी रामधेरला पाठवले. तो या झोनचा प्रमुख होता. मात्र, सुरक्षा दलांच्या वाढत्या दबावापुढे तो टिकू शकला नाही. त्याच्या आत्मसमर्पणानंतर, छत्तीसगडमधील राजनांदगाव, खैरागड, महाराष्ट्रातील गोंदिया आणि मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यांचा समावेश असलेला एमएमसी झोन केवळ सहा महिन्यांत पूर्णपणे नक्षलमुक्त झाला आहे.