scorecardresearch

घातपाताची शक्यता! नक्षलवादी पुन्हा सक्रिय, दक्षिण गडचिरोली परिसरात मोठ्या हालचाली…

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नक्षलवाद्यांकडून सूरजागड प्रकल्पावरून आमदार धर्मरावबाबा आत्राम व प्रशासनाला धमकी देणाऱ्या पत्रावरून खळबळ उडाली

घातपाताची शक्यता! नक्षलवादी पुन्हा सक्रिय, दक्षिण गडचिरोली परिसरात मोठ्या हालचाली…
दक्षिण गडचिरोलीतील एटापल्ली आणि भामरागड जंगल परिसरात नक्षलवाद्यांची मोठ्या प्रमाणात हालचाल

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नक्षलवाद्यांकडून सूरजागड प्रकल्पावरून आमदार धर्मरावबाबा आत्राम व प्रशासनाला धमकी देणाऱ्या पत्रावरून खळबळ उडाली असताना आता दक्षिण गडचिरोलीतील एटापल्ली आणि भामरागड जंगल परिसरात नक्षलवाद्यांची मोठ्या प्रमाणात हालचाल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी नक्षल्यांचा वरिष्ठ नेता गिरीधरने या भागात बैठक घेतल्याने घातपाताच्या शक्यतेने पोलीस विभागाच्या सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

हेही वाचा >>>राहुल शेवाळेंच्या अडचणी वाढणार? बलात्काराच्या आरोपासंदर्भात निलम गोऱ्हेंनी दिले SIT चौकशीचे निर्देश

एटापल्ली तालुक्यातील सूरजागड लोहखनिज उत्खनन सुरू झाल्यापासून अनेक कारणांनी तो वादग्रस्त ठरत आहे. हा परिसर कायम अतिदुर्गम नक्षलग्रस्त राहिला आहे. त्यामुळे या प्रकल्पाला विरोध म्हणून काही वर्षांपूर्वी नक्षल्यांनी लोह प्रकल्पाच्या कंत्राटदार कंपनीच्या ढिल्लन नामक अधिकाऱ्याची हत्या केली होती. २०१६ ला ८० च्यावर वाहनांची जाळपोळ केली होती. मात्र, पोलीसांनी वर्षभरापूर्वी झालेल्या मर्दीनटोला चकमकीत नक्षल्यांचा वरिष्ठ नेता मिलिंद तेलतुंबडेसह २८ नक्षल्यांना ठार केल्यानंतर या भागात नक्षल्यांच्या हालचाली कमी झाल्या होत्या. परंतु मागील महिनाभरापासून नक्षलवादी पुन्हा सक्रिय झाले असून ते मोठा घातपात घडवण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. सूरजागड लोहप्रकल्प लक्ष असल्याने ते एटापल्ली तालुक्यात सक्रिय झाले आहेत. हिवाळी अधिवेशनासाठी राज्यसरकार विदर्भात दाखल झल्याच्या दिवशीच त्यांनी पत्र काढून थेट धमकी दिली. तर काही महिन्यांपासून अबुझमाडमध्ये विश्रांती घेत असलेला नक्षल्यांच्या वरिष्ठ नेता गिरीधरचा या भागात वावर वाढला असल्याने पोलीसही सतर्क झाले आहेत.

दक्षिण भागात नक्षल्यांच्या काही हालचाली टिपल्या गेल्या आहेत. म्हणूनच त्या भागात सतर्कतेच्या दृष्टीने अतिरिक्त पोलीसबळ तैनात करण्यात आले आहे. नक्षलविरोधी मोहीम अधिक गतिमान करण्यात आली आहे. – निलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली</strong>

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-12-2022 at 17:00 IST

संबंधित बातम्या