गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड (एमएमसी) झोनचा प्रमुख तथा केंद्रीय समिती सदस्य रामधेर मज्जी याने आपल्या अकरा सहकाऱ्यांसह छत्तीसगडमधील खैरागड जिल्ह्यात येत असलेल्या कुम्ही, बकर कट्टा पोलीस ठाण्यात आज आठ डिसेंबर रोजी सकाळी शस्त्रांसह आत्मसमर्पण केले. त्याच्यावर विविध राज्यात मिळून तीन कोटीहून अधिक बक्षीस होते. २७ नोव्हेंबर रोजी ‘एमएमसी’ समितीचा प्रवक्ता अनंत उर्फ विकास याने दहा सहकाऱ्यांसह गोंदिया येथे आत्मसमर्पण केले होते. त्यामुळे नक्षलवाद्यांची ‘एमएमसी’ समिती संपुष्टात आल्याचे बोलले जात आहे.

काही दिवसांपूर्वी ‘एमएमसी’ समितीचा प्रवक्ता अनंत याने प्रसिद्धी पत्रक जारी करत १ जानेवारी २०२६ रोजी संपूर्ण समिती आत्मसमर्पण करणार असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु त्यापूर्वीच २७ नोव्हेंबरला अनंतने १० सदस्यांसह गोंदिया पोलिसांसमोर शरणागती पत्करली. तेव्हापासूनच ‘एमएमसी’चा प्रमुख आणि केंद्रीय समिती सदस्य रामधेर देखील शरण येणार असा अंदाज वर्तवला जात होता.

दरम्यान, आज ८ डिसेंबर रोजी त्याने सकाळच्या सुमारास छत्तीसगडमध्ये शस्त्र खाली ठेवले. तत्पूर्वी ७ डिसेंबररोजी देखील याच समितीतील जहाल नक्षल कबीरसह दहा नक्षलवाद्यांनी मध्य प्रदेशातील बालाघाट येथे आत्मसमर्पण केले. सुरक्षा यंत्रणांच्या तीव्र अभियानामुळे मागील वर्षभरात सहा केंद्रीय समिती सदस्य, महासचिव बसवराजू आणि हिडमासारखे सर्वोच्च नक्षल नेते मारले गेले आहेत. तसेच भूपती, चंद्रन्ना आणि रुपेश यांसारख्या वरिष्ठ नेत्यांनी आत्मसमर्पण केल्यामुळे नक्षल संघटनेतून आत्मसमर्पणाचा ओघ सुरूच आहे. छत्तीसगडचा रहिवासी असलेला केंद्रीय समिती सदस्य रामधेर मागील तीन दशकाहून अधिक काळ नक्षल संघटनेत सक्रिय होता. २०२१ मध्ये त्याच्याकडे ‘एमएमसी’ समितीची जबाबदारी देण्यात आली होती.

‘एमएमसी’ समिती संपुष्टात

नक्षल संघटनेत दंडकारण्य आणि एमएमसी समितीचे मोठे महत्त्व आहे. मिलिंद तेलतुंबडेनंतर केंद्रीय समिती सदस्य रामधेर यांच्याकडे याचे नेतृत्व देण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी प्रवक्ता अनंतने शरणागतीसाठी फेब्रुवारीपर्यंत वेळ मागितला होता. मात्र सरकारकडून प्रतिसाद न मिळाल्याने त्याने १ जानेवारीला शस्त्र खाली ठेवणार असल्याचे जाहीर केले. परंतु सुरक्षा दलाचा वाढता दबाव बघून समितीतील सदस्यांनी टप्प्याटप्प्यात मुदतपूर्व आत्मसमर्पण केले. या आत्मसर्पणामुळे संपूर्ण ‘एमएमसी’ समिती संपुष्टात आली आहे. यामुळे अखेरची घटका मोजत असलेल्या नक्षल संघटनेला मोठा धक्का बसला आहे.