scorecardresearch

आदिवासींच्या विकासात नक्षलवाद्यांचा खोडा

नक्षलवादी हे आदिवासी, शेतकरी, दलितांच्या शोषणाविरुद्ध लढा देण्याची भाषा करतात.

Shyam pandharipande
चर्चासत्रात बोलताना न्या. विकास सिरपूरकर.

श्याम पांढरीपांडे यांचे प्रतिपादन

लोकशाही व्यवस्था उलथवून टाकणे हाच नक्षलवादी चळवळीमागचा उद्देश आहे. ही व्यवस्था उलथविण्याचा त्यांना अधिकार आहे, मात्र त्यांनी लोकशाही मार्गाने विरोध करावा आणि व्यवस्था परिवर्तन घडवून आणावे. मात्र, नक्षलवाद्यांनी आदिवासी भागांना आश्रयस्थान बनवून त्यांनी आदिवासींच्या हिताच्या नावावर त्यांनी हिंसाचार घडवून केवळ आदिवासींच्या विकासात खोडा घातला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते श्याम पांढरीपांडे यांनी केले.

भूमकाल या स्वयंसेवी संघटनेतर्फे शनिवारी राष्ट्रभाषा संकुलातील शेवाळकर सभागृहात ‘नक्षली हिंसाचार व माओवादाच्या शहरी कार्यपद्धतीचे आकलन’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. चर्चासत्रात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थान सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांनी भूषविले. व्यासपीठावर लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे ब्युरो चिफ देवेंद्र गावंडे होते.

आदिवासी भागांमध्ये रस्ते निर्माण करणे, पूल बांधणे आदींना विरोध करून नक्षलवाद्यांनी आदिवासींचा विकास रोखला आहे. रस्ते, पूल आणि इतर नागरी सुविधा निर्माण करण्याला विरोध करणाऱ्या नक्षलवाद्यांनी आदिवासींच्या विकासासाठी काही पर्यायी उपाय सुचवायला हवे होते. मात्र, त्यांनी आजवर विकास घडवून आणण्यासाठी त्यांनी एकही उपाय सुचविलेला नाही. त्यांचा व्यवस्थेला केवळ विरोधासाठी विरोध आहे. व्यवस्थेला विरोध करण्याचा सर्वाना अधिकार आहे. लोकशाहीच्या व कायदेशीर मार्गाने विरोध नोंदवायला हवा. मात्र, हिंसक कारवाया करून पोलीस दलातील जवान व इतर सामान्य नागरिकांचा जीव घेणे, कितपत योग्य आहे.  आदिवासींच्या हिताच्या गोष्टी करणाऱ्या नक्षलवाद्यांच्या गोळयांनी सर्वाधिक आदिवासीच मारले जातात, असेही पांढरीपांडे यावेळी म्हणाले.

नक्षलवादी हे आदिवासी, शेतकरी, दलितांच्या शोषणाविरुद्ध लढा देण्याची भाषा करतात. मात्र, नक्षलवादी संघटनांनी आजवर एकही आदिवासी नेता तयार केला नाही किंवा त्यांच्या विकासासाठी लढा दिला नाही. हिंसक मार्गाने लोकशाही व्यवस्था उलथवून टाकणे हाच नक्षलवादी चळवळीमागचा राजकीय उद्देश आहे. हा उद्देश साध्य करण्यासाठी ते जंगलात हिंसाचार घडवून आणतात आणि जंगलातील हिंसाचाराकरिता आवश्यक मनुष्यबळ निर्माण करण्याची जबाबदारी त्यांचे तथाकथीत शहरी नेतृत्व करीत आहे. यासाठी नक्षलवादी आदिवासींना केवळ ढाल म्हणून वापर करीत असल्याचे मत गावंडे यांनी व्यक्त केले. यावेळी पांढरीपांडे यांनीही मार्गदर्शन केले. संचालन प्रा. रश्मी सोवनी यांनी केले. प्रास्ताविक प्रा. अरविंद सोवनी यांनी केले. तर आभार प्रा. श्रीकांत भोवते यांनी मानले.

 

 

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-04-2017 at 01:30 IST

संबंधित बातम्या