Jharkhand Encounter Maoist Dead: केंद्र सरकारने मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद समूळ नष्ट करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले असतानाच, सुरक्षा दलांनी झारखंडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. नक्षलवादी चळवळीचा मास्टर माईंड आणि केंद्रीय समिती सदस्य अनल ऊर्फ तुफान ऊर्फ पतिराम मांझी याच्यासह १६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले. तुफानवर तब्बल एक कोटी रुपयांचे इनाम होते.
गिरिडीह जिल्ह्यातील रहिवासी असलेला जहाल नक्षलवादी अनल हा आपल्या साथीदारांसह सारंडाच्या जंगलात मोठ्या बैठकीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे आयजी साकेत सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली कोब्रा २०३, २०५ आणि २०९ बटालियनच्या जवानांनी जंगलात सापळा रचला. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या या कारवाईमध्ये नक्षलवाद्यांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. घनदाट जंगलात झालेल्या या भीषण चकमकीत कोब्रा कमांडोंनी अचूक निशाणा साधत १६ नक्षलवाद्यांचा खात्मा केला.
घटनास्थळाचा पंचनामा केला असता, तेथे मोठ्या प्रमाणात एके-४७ रायफली आणि स्फोटकांचा साठा आढळून आला. हा शस्त्रसाठा जवानांनी जप्त केला असून, परिसरातील शोधमोहीम अद्याप सुरू आहे. यादरम्यान अधूनमधून गोळीबार सुरु असल्याने मृतांचा आकडा वाढू शकतो, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
दहशतीच्या पर्वाचा अंत
अनल ऊर्फ तुफान हा केवळ नक्षली कारवायांचा सूत्रधार नव्हता, तर सुरक्षा दलांवर हल्ले करणे, शस्त्रे लुटणे आणि भीषण स्फोट घडवून आणण्यात त्याचा थेट सहभाग होता. शेकडो गुन्ह्यांत वॉन्टेड असलेल्या या जहाल नेत्याने सारंडा आणि गिरिडीहच्या भागात दहशतीचे साम्राज्य निर्माण केले होते. अनेकदा पोलिसांना गुंगारा देणारा हा नक्षलवादी अखेर जवानांच्या कारवाईपुढे निष्प्रभ ठरला. केंद्र सरकारने नक्षलवादाविरोधात पुकारलेल्या निर्णायक युद्धातील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. २२ जानेवारी रोजी सारंडाच्या घनदाट जंगलात झालेल्या या चकमकीमुळे झारखंडमधील नक्षल चळवळीचे कंबरडे मोडल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
