गडचिरोली : देशातील नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेल्या ३१ मार्च या ‘डेडलाईन’च्या दिवशी आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि गडचिरोलीत ४३ नक्षलवाद्यांनी एकूण ३ कोटी रोकड ७ किलो सोन्यासह आत्मसमर्पण केले.

देशातील १७० जिल्ह्यात एकेकाळी सत्तेला समांतर व्यवस्था राबवणाऱ्या नक्षलवादी चळवळीचे अस्तित्व आता केवळ दोन बड्या नेत्यांच्या अटकेवर अवलंबून असून, ‘लाल गड’ पूर्णपणे ढासळला असल्याचे चित्र आहे. मात्र, गृहमंत्र्यांनी दिलेल्या कालमर्यादेत देश नक्षलमुक्त झालेला नाही.

गेल्या ३६ वर्षांपासून पोलिसांच्या डोळ्यांत धूळ फेकून वावरणारा कुख्यात नक्षलवादी नेता सी. नारायण राव ऊर्फ सुरेश याने आंध्रप्रदेश पोलिसांसमोर आपल्या आठ सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण केले. १.५ कोटींचे बक्षीस असलेला सुरेश २०१८ मधील विशाखापट्टणम येथील आमदार किदारी सर्वेश्वर राव यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार होता. या कारवाईमुळे आंध्र प्रदेश आता पूर्णपणे ‘नक्षलमुक्त’ झाल्याचा दावा पोलीस महासंचालक हरीश कुमार गुप्ता यांनी केला आहे.

गडचिरोली आणि छत्तीसगडच्या सीमावर्ती भागात छत्तीसगडमधील ९ जहाल नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे शस्त्रे टाकून आत्मसमर्पण केले. त्यामुळे गडचिरोलीत आता एकही सक्रिय नक्षल नसून पोलीस दरबारी नोंद असलेले सहा जण भूमिगत आहेत. त्याचवेळी छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात दण्डकारण्य स्पेशल जोनल कमिटीचे २५ जहाल नक्षलवाद्यांनी, मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतला आहे. या शरणागतीमुळे नक्षलवाद्यांचे लष्करी बळच नाही, तर आर्थिक कंबरडेही मोडले आहे.

सुरक्षा दलांनी या कारवाईत तब्बल १४.०६ कोटी रुपयांची विक्रमी मालमत्ता जप्त केली आहे. यात २.९० कोटींची रोख रक्कम आणि ११.१६ कोटी रुपये मूल्याचे ७.२० किलो सोने हस्तगत करण्यात आले आहे. तसेच एके-४७, एलएमजी, एसएलआर आणि इन्सास सारखी ९३ घातक शस्त्रेही पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली आहेत.

२००४ मध्ये पीपल्स वॉर ग्रुप आणि माओइस्ट कम्युनिस्ट सेंटरच्या विलीनीकरणानंतर ‘भाकपा (माओवादी )’ हा पक्ष आकाराला आला होता. मुप्पाला लक्ष्मण राव ऊर्फ गणपतीच्या काळात ही चळवळ १७० जिल्ह्यांपर्यंत फोफावली होती. मात्र, २१ मे २०२५ रोजी नंबला केशव राव ऊर्फ बसव राजूचा खात्मा झाल्यानंतर या चळवळीच्या पडझडीला वेग आला. पोलिसांच्या वाढत्या दबावामुळे दुसऱ्या फळीतील भूपती, देवजी यांसारख्या नेत्यांनी आधीच आत्मसमर्पणाचा मार्ग स्वीकारला आहे.

सध्या नक्षलवाद्यांच्या ‘पॉलिट ब्युरो’मध्ये केवळ दोन सदस्य शिल्लक आहेत. यात ३.५ कोटींचे बक्षीस असलेला मुप्पाला लक्ष्मण राव ऊर्फ गणपती सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे नेपाळमध्ये लपल्याची शक्यता आहे, तर झारखंडचा रहिवासी असलेला मिशिर बेसरा बिहार-ओडिशा सीमाभागात सक्रिय असून त्याच्यावर १.५ कोटींचे बक्षीस आहे. यामुळे प्रशासनाला ‘नक्षलमुक्ती’साठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.