गडचिरोली : देशातील नक्षलवाद पूर्णपणे मोडीत काढण्यासाठी केंद्र सरकारने ३१ मार्च २०२६ ची ‘डेडलाइन’ निश्चित केली असतानाच, तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये नक्षली चळवळीला मोठा हादरा बसला आहे. शनिवारी एका विशेष कार्यक्रमात प्रतिबंधित नक्षलवादी संघटनेच्या १३० नक्षलवाद्यांनी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासमोर शस्त्रे खाली ठेवून आत्मसमर्पण केले. यामध्ये अनेक बड्या नेत्यांचा समावेश असून, मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक शस्त्रास्त्रेही पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली आहेत. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च नेता पॉलीट ब्युरो सदस्य देवजी, केंद्रीय समिती सदस्य संग्राम याच्यासह चार नेत्यांनी आत्मसमर्पण केले होते.
नक्षलवाद संपवण्याचे उद्दिष्ट
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत देशातून नक्षलवाद पूर्णपणे समाप्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांची वाढती कारवाई आणि सरकारच्या प्रभावी पुनर्वसन धोरणामुळे नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडल्याचे चित्र दिसत आहे. एका बाजूला अनेक भागांत चकमकींमध्ये नक्षलवादी मारले जात असताना, दुसरीकडे मोठ्या संख्येने नक्षलवादी मुख्य प्रवाहात परतत आहेत. या सामूहिक आत्मसमर्पणाला नक्षलविरोधी मोहिमेतील ऐतिहासिक यश मानले जात आहे.
१२५ नक्षलवादी छत्तीसगडमधील
आत्मसमर्पण करणाऱ्या १३० जणांपैकी १२५ नक्षलवादी छत्तीसगडमधील आहेत, तर ४ तेलंगणा आणि १ आंध्र प्रदेशचा आहे. यामध्ये संघटनेच्या धोरण निश्चितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे ३ राज्य समिती सदस्य, १० विभागीय समिती सदस्य, ४६ एरिया कमिटी सदस्य आणि ७६ दलम सदस्यांचा समावेश आहे. आत्मसमर्पणावेळी नक्षलवाद्यांनी ३१ ए.के.-४७ रायफल्स, २१ इन्सास रायफल्स, २० एसएलआर रायफल्स आणि एक इन्सास एलएमजी रायफल यांसह मोठ्या प्रमाणात दारूगोळा प्रशासनाकडे सुपूर्द केला.
मुख्यमंत्री रेवंत रेड्डींकडून स्वागत
या प्रसंगी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी आत्मसमर्पण करणाऱ्यांचे स्वागत केले. महात्मा गांधींच्या या देशात हिंसक आणि सशस्त्र मार्गाने कोणत्याही समस्येचे निराकरण होऊ शकत नाही. भरकटलेल्यांनी आता लोकशाही आणि शांततेच्या मार्गावर परतावे, असे आवाहन त्यांनी केले. मुख्यमंत्र्यांनी नक्षलवाद्यांना ‘बुलेट’चे राजकारण सोडून ‘बॅलेट’च्या राजकारणात सहभागी होण्याचे आवाहन केले. लोकशाहीत जनतेची सेवा आणि हक्कांची लढाई लढण्याचे निवडणूक हेच सर्वात मोठे माध्यम असल्याचे त्यांनी सांगितले.
गणपतीने मुख्य प्रवाहात यावे
नक्षलवादी संघटनेचा सर्वोच्च नेता गणपती यानेही हिंसेचा मार्ग सोडावा, सरकार त्याला पूर्ण सुरक्षा आणि सन्मानजनक पुनर्वसन देईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्य सरकार आत्मसमर्पण करणाऱ्यांना रोजगार, शिक्षण आणि सुरक्षेसह सर्वतोपरी मदत करेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. गेल्या काही वर्षांत नक्षलग्रस्त भागात झालेली विकासकामे, रस्ते आणि आरोग्य सुविधांमुळे नक्षलवाद्यांचा जनाधार घटत चालल्याचे या मोठ्या शरणागतीवरून स्पष्ट होत आहे.
