लोकसत्ता टीम गोंदिया: गेल्या आठवड्यात जुन्या पेन्शनला घेऊन राज्य सरकारी कर्मचारी व अधिकारी वर्गाने आंदोलन करून सरकारला जेरीस आणले होते. मात्र, संघटनाच्या समन्वय समितीने संप मागे घेतल्याने जुन्या पेन्शनचा प्रश्न तसाच कायम राहिलेला असताना आज रविवारला २६ मार्चला गोंदिया जिल्ह्यातील आमगाव-सालेकसा मार्गावर बाघ नदीच्या पलीकडे ‘सीपीआय माओवादी’ या नक्षल संघटनेचे जुन्या पेन्शनला समर्थन असल्याचे बॅनर आढळून आले. यामुळे खळबळ उडाली. यातील बॅनर नवीन पेन्शन योजना रद्द करण्यात यावे, ठेकेदारीकरण बंद करण्यात यावे. मेस्मा कायदा लागू करणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारचा मुर्दाबाद अशा अनेक घोषणा बॅनरमध्ये लिहिलेल्या आहेत. सोबतच काढलेले पत्रक हे महाराष्ट्र मध्यप्रदेश छत्तीसगड झोनल (माओवादी) कमेटीचे प्रवक्ता अनंत यांच्या नावे आहे. सदर फलक लागलेले असल्याची माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन ते फलक काढण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू केला असल्याची माहिती सालेकसा चे पोलीस निरीक्षक बोरसे यांनी दिली. या संदर्भात विचारणा केली असता सदर लावण्यात आलेले फलक नक्षल्यांनीच लावले की कुणी कुरघोडी करण्याच्या उद्देशाने लावले याचा तपास सुरू असल्याची माहिती गोंदिया जिल्हा नक्षल सेलचे प्रमुख दिनेश तायडे यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.