वर्धा : नेत्यांनी निवडणुकीत दिलेले आश्वासन लोकं आता लक्षात ठेवू लागले आहेत. आश्वासन देत निवडून आलेल्या नेत्यास मग प्रश्न विचारणे सूर होऊन जाते. असेच हे प्रकरण. पदभार स्वीकारून अवघे २० दिवस होत नाही तोच नगराध्यक्षास प्रश्न विचारणे सूरू. कारण खुद्द मुख्यमंत्र्यांनी या उमेदवाराची दखल घेतलेली. राज्यभराची जबाबदारी देण्याची ग्वाही मिळालेली पण आता पेच.

पालिका निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभर प्रचार दौरे केले. पण नगराध्यक्ष पदाच्या भाजप उमेदवाराची त्यांनी सर्वाधिक प्रशंसा हिंगणघाट सभेत केली होती. येथील भाजप उमेदवार डॉ. नयना उमेश तुळसकर ह्या विविध विषयात पदवीप्राप्त असतानाच त्यांनी पीएचडी ही घन कचरा व्यवस्थापन या विषयात केली आहे. तो संदर्भ देत मुख्यमंत्री फडणवीस बोलून चुकले की या तर विदर्भात सर्वाधिक शिकलेल्या उमेदवार. त्यांचे शिक्षण लक्षात घेत त्यांना निवडून आल्यावर आमदार समीर कुणावार यांच्या सूचनेने राज्यातील घन कचरा व्यवस्थापन मॉडेल तयार करण्याची जबाबदारी दिल्या जाईल. मुख्यमंत्री म्हणाले आणि नयनाताई विदर्भात सर्वाधिक मतांनी निवडून आल्यात.

आता पुढे ?

हाच प्रश्न हिंगणघाटकर विचारू लागले आहेत. कारण हे शहर कार्यसम्राट म्हटल्या जाणाऱ्या आमदार कुणावार यांचे की कचऱ्याचे. कारण चौका चौकात कचरा साचून असलेला. आरोग्याचे प्रश्न निर्माण झालेले. निवडून आल्यावर खुद्द डॉ. तुळसकर यांनी ग्वाही दिली होती की मी कचरा व्यवस्थापनची डॉक्टर आहे. म्हणून स्वच्छतेत मोठा बदल दिसेल. पण ग्वाही लोकं फसवी म्हणू लागले आहेत. कारण न्यायाधीश कॉलोनी, शाळा व बाजार परिसर आणि अन्य ठिकाणी कचरा दुर्गंधी निर्माण करीत आहे. डॉक्टर मॅडम उपचार करणार केव्हा, असे प्रश्न नागरिक मांडू लागले आहेत.

यावर विचारणा केल्यावर नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर म्हणतात की पदभार स्वीकारून फक्त २० दिवस झालेत. लोकं अपेक्षा करतात. ते चूक नाहीच. कारण विक्रमी मतांनी त्यांनीच मला निवडून दिले. पण पद स्वीकारल्यानंतर मी सर्व माहिती घेतली. तर गोंधळ दिसून आला. १५ व्या वित्त आयोगाचा निधी अडीच वर्षांपासून आलेला नाही. त्यातूनच कचरा निर्मूलन टेंडर काढल्या जाते. कर वसुली ठप्प. ४ कोटी रुपयाचा कर थकीत असल्याने त्यातून करातून काही करण्याची ताकद नाही. १२ महिन्याचे बिल मिळाले नाही म्हणून कंत्राटदार काम करायला तयार नाही. असे असूनही कचरा प्रश्न सुटावा म्हणून परत टेंडर काढले. नवा कंत्राटदार राजी होवू शकतो. पालिकेचे प्रश्न असे आ वाचून उभे ठाकतील, याची आता जाणीव झाली. पण कचरा किती तापदायक ठरतो हे एक स्त्री म्हणून मी समजू शकते. पण खात्री देते की अवधी द्या हे शहर कचरामुक्त करण्याची वाटचाल सूरू झाली समजा. आमदार कुणावार यांचे मार्गदर्शन असून निधी मिळावा म्हणून शासनाकडे पाठपुरावा सूरू आहे. नक्की मार्ग निघेल.