NCC Training Academy in Nagpur : नागपूर : देशसेवेसाठी समर्पित तरुणांना विविध पातळ्यांवर तयार करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय छात्रसेना (एनसीसी) स्वतःच्या प्रशिक्षण संस्थांवर भर देत आहे. त्या अंतर्गत राज्यातील दुसरी प्रशिक्षण अकादमी नागपुरात सुरू होणार आहे, अशी माहिती एनसीसी महाराष्ट्र संचालनालायचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल विवेक त्यागी यांनी बुधवारी दिली.

विदर्भ दौऱ्यावर आलेल्या मेजर जनरल त्यागी यांनी पत्रकारांशी साधलेल्या संवादात ‘एनसीसी’च्या वाटचालीवर प्रकाश टाकला. त्यागी म्हणाले, भारतीय सैन्य दलातल्या तिन्ही तुकड्यांसाठी शाळा आणि महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थ्यांना शिस्त आणि लष्करी प्रशिक्षण देणाऱ्या एनसीसीकडे स्वतःचे प्रशिक्षण केंद्र नव्हते. छत्रपती संभाजी नगर येथे त्यासाठी स्वतंत्र रचना कार्यान्वित झाली. त्या धर्तीवर आगामी काळात नागपूर पाठोपाठ कोकण आणि मुंबई येथे आणखी दोन प्रशिक्षण अकादमी सुरू होतील. या अंतर्गत वर्षाकाठी वीस हजार कॅडेट्सना प्रशिक्षण मिळेल. येथे प्रवेश घेणाऱ्या छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांना कुठल्याही शाळा-महाविद्यालयावर अवलंबून राहावे लागणार नाही.

काय होणार अकादमीत

येथे विद्यार्थ्यांना तीन पातळ्यांवर कौशल्य प्रशिक्षणाचे धडे मिळतील. यात आपत्ती व्यवस्थापन शिघ्र प्रतिसाद, सायबर रक्षक आणि धाडस मोहिम सारख्या बाबींचा समावेश असेल. येथे प्रशिक्षण घेतलेला विद्यार्थी सैन्यदलातच गेला पाहिजे, ही सक्ती नाही. तो अन्यक्षेत्रातही करीअरची दिशा ठरवू शकतो. अकादमीसाठी १० एकर जागा मिळावी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पत्रव्यवहार झाला असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

ड्रोन तंत्रासाठी स्वतंत्र शाखा

उपराजधनातील राष्ट्रीय स्तरावरील अकादमीत स्वतंत्रपणे ड्रोन प्रशिक्षण केंद्र असेल. राज्यातून निवडलेल्या १७० कॅडेट्सची पहिली तुकडी या प्रशिक्षणासाठी लवकरच नागपूरला पोहोचणार आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना यात अत्याधुनिक ड्रोन हाताळणीचे विशेष प्रशिक्षण दिले जाईल. सध्याच्या सत्रात याची औपचारिक सुरुवात होणार आहे. या प्रशिक्षणात भूदल, वायुदल आणि नौदलाचे कॅडेट्स सहभागी होतील.

ड्रोनसोबतच सायबर प्रशिक्षणावरही भर

वाढते सायबर धोके लक्षात घेता कॅडेट्सना सायबर सुरक्षा आणि सायबर प्रशिक्षणाची माहिती दिली जाईल. या संदर्भात माहिती क्षेत्रातील अग्रगण्य संस्थांनी सामंजस्य कराराची तयारी दर्शवली आहे. नागपूर येथील ड्रोन प्रशिक्षण केंद्र राष्ट्रीय स्तरावरील असेल. राज्य स्तरावरील कॅडेट्ससाठी पुणे येथे ड्रोन प्रशिक्षण घेता येईल.

अकादमीत मुलांसोबतच निम्या मुलींना संधी

सद्यस्थितीत भारतीय राष्ट्रीय छात्रसेनेकडे राज्यात दीड कॅडेट्स आहेत. त्यामध्ये मुला-मुलींचे प्रमाण ६० : ४० असे आहे. भविष्यात हे प्रमाण ५०-५० टक्क्यांवर आणण्याचा प्रयत्न असेल. नागपुरात सुरू होणाऱ्या एनसीसीच्या प्रशिक्षण अकादमीपासून त्याची सुरुवात होईल. मुलांप्रमाणेच मुलींनाही सम प्रमाणात संधी देण्यावर भर दिला जात आहे.

आगामी काळात प्राथमिक लष्करी प्रशिक्षणाच्या पुढे जाऊन राष्ट्रीय छात्र सेनेतील विद्यार्थ्यांना धाडसी मोहिमा, सायबर सुरक्षक आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात अद्ययावत प्रशिक्षण दिले जाईल, असेही मेजर जनरल त्यागी यांनी नमूद केले.