यवतमाळ : दहावी-बारावीच्या उंबरठ्यावर असलेल्या विद्यार्थ्यांसमोर आणि त्यांच्या पालकांसमोर आता पुढे काय? हा मोठा प्रश्न असतो. योग्य मार्गदर्शनाअभावी विद्यार्थी चुकीचे क्षेत्र निवडतात. ही चूक टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्याच्या अंगभूत गुणांना वाव देणारे क्षेत्र निवडता यावे, यासाठी केंद्र सरकारच्या ‘एनसीईआरटी’ने ‘तमन्ना’ हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे.
शालेय शिक्षण विभागाने या पथदर्शी प्रकल्पांतर्गत निवडक शाळांना ‘समुपदेशन केंद्र’ म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या करिअरला आता नवी दिशा मिळणार आहे.
‘तमन्ना’ म्हणजेच ‘ट्राय अँड मेझर अॅप्टिट्यूड अँड नॅचरल अॅबिलिटी’. ही एक वैज्ञानिक अभिक्षमता चाचणी असून ती विशेषतः इयत्ता ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी विकसित करण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाने या पथदर्शी प्रकल्पांतर्गत अनेक शाळांची निवड ‘समुपदेशन केंद्र’ म्हणून केली असून, याद्वारे विद्यार्थ्यांच्या नैसर्गिक आवडीनुसार त्यांना भविष्यातील वाटा निवडता येणार आहेत.
ही चाचणी एनसीईआरटी आणि सीबीएसई यांनी संयुक्तपणे तयार केली असून, यात ‘अंतरंग’ या संस्थेचे तांत्रिक सहकार्य लाभले आहे. या उपक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात केवळ लेखी गुणांना महत्त्व न देता विद्यार्थ्याच्या सुप्त गुणांचा शोध घेतला जातो. यामध्ये प्रामुख्याने सात क्षमतांवर भर देण्यात आला आहे, ज्यात भाषिक क्षमता, अमूर्त तर्क, शाब्दिक तर्कशक्ती, यांत्रिक तर्कशक्ती, संख्यात्मक क्षमता, स्थानिक क्षमता आणि आकलन अभिक्षमता यांचा समावेश होतो. या चाचणीचे स्वरूप अत्यंत सुटसुटीत असून विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने १० मिनिटांत ३० प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. ऑनलाईन प्रक्रिया असल्याने निकाल तातडीने उपलब्ध होतो आणि त्या आधारे विद्यार्थ्याला कोणत्या प्रकारचा अभ्यासक्रम निवडणे योग्य आहे, याचा वस्तुनिष्ठ अहवाल मिळतो.
’तमन्ना’ प्रकल्पात ‘गुड फिट करिअर’ या संकल्पनेला विशेष महत्त्व दिले आहे. यामध्ये विद्यार्थ्याची आवड, त्याची प्रत्यक्ष अभिक्षमता आणि वास्तविकता या तीन महत्त्वाच्या पैलूंची चाचपणी केली जाते. यामुळे विद्यार्थ्याला काय आवडते आणि त्याला प्रत्यक्षात काय करणे शक्य आहे, याचा मेळ घातला जातो. या प्रशिक्षणादरम्यान एनसीईआरटीने ५३० प्रकारच्या विविध करिअर कार्ड्सची माहिती संकलित केली आहे. ही माहिती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत शिक्षक आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. या करिअर कार्ड्समुळे विद्यार्थ्यांना पारंपारिक क्षेत्रांपलीकडे असलेल्या संधींची ओळख होईल.
पालक आणि समाजाच्या दबावाखाली न येता वैज्ञानिक पद्धतीने करिअर निवडता यावे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. यातून विद्यार्थ्याची बलस्थाने आणि त्याचे कमकुवत दुवे समोर येतात, ज्यामुळे भविष्यातील अपयश टाळण्यास मदत होते. केवळ गुणांच्या आधारे करिअर निवडण्यापेक्षा स्वतःच्या कौशल्यांची ओळख पटल्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होत आहे.या उपक्रमामुळे शिक्षण क्षेत्रात गुणात्मक बदल घडून येतील आणि प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या क्षमतेनुसार योग्य व्यासपीठ उपलब्ध होईल, असा विश्वास शिक्षण तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.
