अकोला : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सातत्याने चर्चेत असतात. त्यांच्या या वक्तव्यांवरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर नाराजी व्यक्त करून तंबी देखील दिली होती. त्यानंतरही फारसा बदल न झाल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठे पाऊल उचलले आहे. आमदार अमोल मिटकरी आणि रूपाली ठोंबरे पाटील यांची प्रवक्ते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीने नव्या प्रवक्तांची यादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या स्वाक्षरीने जाहीर केली. या यादीत अमोल मिटकरी व रुपाली ठोंबरे पाटील यांना स्थान देण्यात आले नाही. वादग्रस्त वक्तव्यांमुळे या दोघांची गच्छंती केल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

पार्थ पवार जमीन प्रकरण यासह विविध कारणांमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पक्षातीलच आमदार व पदाधिकाऱ्यांकडून वादग्रस्त विधान करण्यात येत असल्याने अनेक वेळा पक्ष कोंडीत सापडतो. त्यामुळे पक्षाने कठोर पावले उचलत नव्या प्रवक्त्यांची नियुक्ती जाहीर केली. यामध्ये प्रवक्ते पदावरून आमदार अमोल मिटकरी आणि रूपाली ठोंबरे पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त विधाने करुन स्वत:च्या पक्षाची कोंडी आमदार अमोल मिटकरी यांनी केली. अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यांमुळे महायुतीमध्ये सातत्याने तणाव निर्माण होत होता. याशिवाय पक्षाचेच आमदार संग्राम जगताप यांच्यावरही अमोल मिटकरी यांनी टीका केली होती. त्यावरून पक्षातीलच आमदारांमध्ये मोठे मतभेद समोर आले होते. अमोल मिटकरी सातत्याने वादग्रस्त विधाने करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करीत असतात. यावर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त करून सांभाळून बोलण्याचा सल्ला देखील दिला होता.

रूपाली ठोंबरे पाटील यांनाही पदावरून हटवले

फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणावरुन रुपाली ठोंबरे यांनी आपल्याच पक्षाच्या रुपाली चाकणकर यांना लक्ष्य केले होते. त्यामुळे रुपाली ठोंबरे पाटील यांना कारणे दाखवा नोटीसही पाठवण्यात आली होती. त्यानंतर रुपाली ठोंबरे पाटील यांनी अजित पवार यांचीही भेट घेतली होती. ही भेट होऊन काही तास उलटत नाही तोच रुपाली ठोंबरे पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. याशिवाय, वैशाली नागवडे आणि संजय तटकरे यांना देखील प्रवक्ते पदावरून हटवण्यात आले आहे.