गोंदिया : लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीला राज्यात मोठा फटका बसला. राष्ट्रवादी काँग्रेसला रायगड ही एकमेव जागा जिंकता आली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांची घोर निराशा झाली. तरीही राष्ट्रवादीकडून विधानसभेच्या ८५ ते ९० जागांवर दावा केला जाईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी दिली.

ते रविवारी गोंदियातील एन.एम.डी. महाविद्यालयातील सभागृहात आयोजित पत्रपरिषदेत बोलत होते. एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेत ५७ आमदार होते, ही गोष्ट लक्षात घेता आम्ही विधानसभेत ८५ ते ९० जागा मागणार आहोत. शिवसेनेला जेवढ्या जागा दिल्या जातील, तेवढ्याच जागा राष्ट्रवादीला द्याव्यात, असे पटेल यांनी म्हटले आहे. यामुळे महायुतीत आता जागावाटपावरून पुन्हा राजी-नाराजी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा : यवतमाळ : महागाव तालुक्यात पुन्हा दरोडा, चक्क १६ क्विंटल मासोळीसह वाहनही पळवले

लोकसभा निवडणुकांपूर्वी जागावाटपातही चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळाली होती. सातारा आणि नाशिकच्या जागेवरून चांगलाच वाद रंगला होता, त्यामुळे नाशिकची जागा जाहीर करण्यास महायुतीला उशीर झाला. नाशिकची जागा उशिरा जाहीर झाल्यामुळेच आमचा पराभव झाला, असेही महायुतीमधील शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून म्हटले जात आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांसाठीचे जागावाटप तरी लवकर होईल का, हा खरा प्रश्न आहे.

मंत्रिपद मलाच मिळणार

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्रातून राष्ट्रवादीकडून प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, राष्ट्रवादीला राज्यमंत्रीपद देऊ केल्यामुळे त्यांनी ते नाकारत कॅबिनेट मंत्रीपद पाहिजे, अशी मागणी केली होती. त्यावर भाजपने आम्ही विचार करू, असे म्हटले. त्यातच, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले. आता सुनेत्रा पवार यांना राज्यमंत्रीपद दिले जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या कोट्यात जर कॅबिनेट मंत्रिपद आले तर ते मलाच मिळणार, असा दावा पटेल यांनी केला. योग्य वेळ आल्यावर योग्य निर्णय होईल, असेही पटेल यांनी सांगितले.

हेही वाचा : बुलढाणा : खामगावच्या ‘आयटी’ अभियंत्याला २८ लाखांनी गंडविले

राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार

गेल्या अनेक दिवसांपासून महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार थांबलेला आहे. त्यासंदर्भात प्रफुल पटेल यांना विचारले असता, लवकरच महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार होणार आणि जी पदे रिकामी आहेत अथवा लोकसभेत गेलेल्या सदस्यांमुळे जी पदे रिकामी झालेली आहेत, त्या पदांवर नवे मंत्री निवडले जाईल. मंत्रिमंडळ विस्तारानंतर विधानसभा निवडणुकांसाठी जोमाने काम करता येईल, असेही पटेल यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीत चित्र बदलेल

लोकसभा निवडणुकीमध्ये रालोआ सरकारला अपेक्षित यश आले नाही. महाराष्ट्रातदेखील परिस्थिती वेगळीच राहिली. मात्र, आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये हे चित्र बदलेल, असा आशावाद पटेल यांनी यावेळी बोलून दाखविला.

हेही वाचा : आनंदवार्ता…विद्यार्थ्यांना एसटी पास थेट शाळेत मिळणार! महामंडळ म्हणते…

‘रालोआ’ला चुकीच्या प्रचाराचा फटका

महाराष्ट्रात मोदी सरकार पुन्हा सत्तेत आल्यास ते संविधान बदलणार, संविधान बदलण्यासाठीच ‘४०० पार’ हवे आहे, असा चुकीचा प्रचार विरोधकांकडून करण्यात आला. त्यामुळे अनेक ठिकाणी आम्ही मागे राहिलो, अशी खंतही प्रफुल पटेल यांनी यावेळी व्यक्त केली. पत्रपरिषदेला आमदार मनोहर चंद्रिकापुरे, माजी आमदार राजेंद्र जैन उपस्थित होते.