अकोला : विधान परिषद निवडणुकीवरून राष्ट्रवादी अजित पवार गटात आता नाराजीनाट्य सुरू झाले आहे. विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीने झिशान सिद्दिकी यांना संधी दिली. त्यावर आमदार अमोल मिटकरी यांनी खंत व्यक्त केली आहे. पक्षाकडून आपल्याला साधी विचारणा किंवा दिलासा सुद्धा देण्यात आलेला नाही. अजितदादांसाठी लढाई लढलो, हीच आपली चूक आहे का? असा सवाल सुद्धा आमदार मिटकरी यांनी उपस्थित केला.
विधान परिषद सदस्य पदावरून आमदार अमोल मिटकरी १२ मे रोजी निवृत्त होत आहे. नव्या सदस्यांच्या निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम सुरू असून राष्ट्रवादी पक्षाने आता झिशान सिद्दिकी यांच्यावर विश्वास दाखवला. अमोल मिटकरी यांना पुन्हा संधी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. या संदर्भात त्यांनी आपल्या ‘एक्स’ खात्यावर भावनांना वाट मोकळी करून दिली.
लढाईचं हेच फळ मिळेल ही मानसिक होती
अमोल मिटकरी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले, ‘‘माझ्या लढाईचं हेच फळ मिळेल ही मानसिक तयारी २९ जानेवारीलाच केली होती. अजितदादांसाठी ‘एक संधी’ काय अशा ‘हजार संधी’ हा अमोल मिटकरी ओवाळून टाकेल. तुमची लढाई कालही लढत होतो, आजही लढत आहे आणि उद्याही लढत राहील. या लढाईत कोणी सोबत असो अथवा नसो न्याय मिळेपर्यंत ही लढाई थांबवणार नाही, तीच तुम्हाला खरी श्रद्धांजली ठरेल. अपघाताचं सत्य समोर येईपर्यंत मी शांत बसणार नाही. वेळ पडल्यास याहीपेक्षा मोठी किंमत चुकवेल. जान भी देंगे.’’
निकष काय लावले?
विधान परिषदेसाठी उमेदवारी न मिळाल्याने खंत व्यक्त केली आहे. देवगिरी बंगल्यावर उमेदवारीसाठी खल सुरू होते. ७० ते ७५ नावे होती. त्यापैकी एक नाव अंतिम करणे अत्यंत अवघड होते. निकष काय लावले? हा विषय आहे, असे अमोल मिटकरी म्हणाले. विधान परिषदेवर अमोल मिटकरींच्या जागेवर झिशान सिद्दिकी यांना संधी दिली जात आहे तर मी कमी कुठे पडलो? हे स्पष्ट व्हायला हवे. अजितदादांच्या अपघात प्रकरणाचा मुद्दा विधान परिषद लावण्याचा पूर्ण प्रयत्न केला. पण तो शेवटपर्यंत लागला नाही. हा मुद्दा लावून मला डावले असेल तर ते पण सांगायला हवे होते, अशी अपेक्षा मिटकरी यांनी व्यक्त केली आहे.
