जिल्हा परिषदेत आज सभापती निवड

जिल्हा परिषदेच्या  चार समित्यांपैकी दोन समित्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाव्या, अशी मागणी पक्षाकडून केली जात आहे.

(संग्रहित छायाचित्र)

 

राष्ट्रवादीने मागितली दोन पदे, काँग्रेस एकवरच ठाम 

नागपूर : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष ही दोन्ही पदे काँग्रेसने आपल्या पदरात पाडून घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत दोन सभापती मिळावे, असा आग्रह धरला आहे. यावर उद्या होणाऱ्या विषय समिती सभापतीच्या निवडणुकीत बहुमतात असलेली काँग्रेस काय निर्णय घेणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने दोन सभापती मिळाले नाही तर विरोधात बसण्याचा निर्णय घेऊ, अशी भूमिका घेतली आहे.

जिल्हा परिषदेच्या  चार समित्यांपैकी दोन समित्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाव्या, अशी मागणी पक्षाकडून केली जात आहे. परंतु काँग्रेस एकच समिती देण्यावर ठाम आहे. केदार गटाच्या मर्जीनुसार सभापतीपदे दिली जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. जिल्हा परिषदेमध्ये केदार गटाचे १३ सदस्य आहेत.  जिल्ह्य़ातील स्थानिक प्रमुख नेत्यांच्या बैठकीत यावर गेल्या आठवडय़ात खलबते झाली. वेळ आली तर विरोधात बसू, असा  निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी घेतला आहे. भाजपचे केवळ १५ सदस्य असल्यामुळे ते विरोधी बाकावर बसणार हे स्पष्ट आहे.

जिल्हा परिषदेमध्ये बांधकाम, आरोग्य, अर्थ, शिक्षण, समाजकल्याण, महिला व बालकल्याण, कृषी आणि पशुसंवर्धन अशा समित्या आहेत. त्यात बांधकाम व आरोग्य हे परंपरेप्रमाणे उपाध्यक्षांकडे असते. अर्थ, शिक्षण आणि कृषी व पशुसंवर्धन या विभागासाठी प्रत्येकी एक सभापती राहणार असून  या समित्यांवर काँग्रेसने दावा केला आहे. समाजकल्याण व महिला बालकल्याण समितीवर प्रत्येकी एक सभापती असल्यामुळे त्यातील समाजकल्याण समिती राष्ट्रवादी तर महिला व बालकल्याण समिती  काँग्रेस स्वत:कडे ठेवण्याचा विचार करीत आहे. याबाबत पक्षश्रेष्ठीच्या बैठकी सुरू आहेत.

दुपारी तीन वाजता घोषणा

जिल्हा परिषधेमध्ये उद्या, गुरुवारी सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत चारही विषय समितीच्या सभापतीपदासाठी नामांकन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल आणि तीन वाजता विशेष सभेत सभापतींची निवड केली जाणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ncp congress zp sabhapati election akp

ताज्या बातम्या