चंद्रपूर : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादीत कलह ; ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांचा राजीनामा | NCP District President Rajendra Vaidya resigned from the post amy 95 | Loksatta

चंद्रपूर : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादीत कलह ; ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांचा राजीनामा

स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक तोंडावर आली असताना चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत वाद उफाळून आला आहे.

चंद्रपूर : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादीत कलह ; ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांचा राजीनामा
ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य

स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक तोंडावर आली असताना चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत वाद उफाळून आला आहे. एका नियुक्तीत विश्वासात घेतले नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) राजेंद्र वैद्य यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे, वैद्य यांनी महिनाभरापूर्वीच राजीनामा दिला होता. ही बाब त्यांनी जाणीवपूर्वक लपवून ठेवली होती.

हेही वाचा >>>नागपूर : ॲड. उकेंची पोलीस कोठडीची मागणी करणारा अर्ज फेटाळला

अठरा वर्षांपूर्वी, २००४ मध्ये काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन राजेंद्र वैद्य यांनी बहुजन समाज पार्टीकडून लोकसभा निवडणुक लढविली होती. त्यावेळी त्यांनी १ लाख ५ हजार मते घेतली. एका नवख्या उमेदवाराने लाखावर मते घेतल्याने वैद्य राजकीय वर्तुळात चर्चेत आले. मात्र, बसपामध्ये जास्त दिवस रमले नाही. त्यांनी लगेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतल्यानंतर त्यांना लवकरच जिल्हाध्यक्षपद देण्यात आले. २०१४ पर्यंत ते या पदावर कायम होते. त्यानंतर संदीप गड्डमवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसची (ग्रामीण) धुरा आली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत गड्डमवार शिवसेनेत गेले. त्यावेळी ज्येष्ठ नेते म्हणून वैद्य यांच्यावरच पक्षनेतृत्वाने विश्वास दाखवला. तेव्हापासून आजतागायत वैद्य या पदावर कायम होते.

हेही वाचा >>>नागपूर : ‘पेट’ परीक्षा ९ ते १२ नोव्हेंबरदरम्यान

या काळात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी वैद्य यांची चांगलीच जवळीक निर्माण झाली. परंतु, जिल्ह्यातील पक्षातंर्गत गटातटाचे राजकारण ते थांबवू शकले नाही. राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील गेल्या सहा महिन्यांत चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येऊन गेले. त्यावेळीही राष्ट्रवादीत दुफळी कायम राहिली. याचे पडसाद पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्येही उमटायला लागले.राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांना पक्षाने बढती दिली. ते प्रदेश कार्याध्यक्ष झाले. या रिक्त जागेवर आपल्या मर्जीतील माणूस असावा म्हणून वैद्य यांनी प्रयत्न केले. त्यांनी या पदासाठी बल्लारपूर येथील युवकाचे नाव समोर केले होते. मात्र, पक्षाने फैय्याज शेख यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद दिले. त्यामुळे वैद्य कमालीचे नाराज झाले. याच नाराजीतून त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.दरम्यान, वैद्य यांच्याशी संपर्क केला असता, नऊ वर्ष जिल्हाध्यक्ष पद सांभाळले. कौटुंबिक कारणांमुळे पक्षाला अधिक वेळ देता येणार नाही. त्यामुळे राजीनामा दिला आहे. मात्र, पक्षात सक्रिय राहीन, असे त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-11-2022 at 13:06 IST
Next Story
नागपूर : ॲड. उकेंची पोलीस कोठडीची मागणी करणारा अर्ज फेटाळला