अकोला : अजित पवारांच्या विमान अपघातावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींच्या मनात प्रश्नांचा आगडोंब उसळला आहे. मनात शंकेचं काहूर निर्माण झाले. अमोल मिटकरी यांनी अनेक प्रश्न उपस्थित करून शंका उपस्थित केल्या आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत २८ जानेवारीला निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली. राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या सर्व घटनेवर आमदार अमोल मिटकरी यांनी समाज माध्यम पोस्ट टाकून विविध प्रश्न उपस्थित केले आहेत.

ते म्हणाले, “दादा गेले हे अजूनही कुणाचंच मन मानायला तयार नाही. काल देवगिरीवरील त्या दोन खुर्च्या बघून परत डोळे पाणावले. त्यातील पहिली खुर्ची – सामान्य माणसाची कामे वा तक्रार नीट बाजूला बसून ऐकणाऱ्या व्यक्तीची. आणि दुसरी – दादांची! मृत्यूच्या अगोदरच्या दिवशी दुपारनंतर कुठलाच कार्यक्रम नव्हता. दादा याच ठिकाणी पक्षातील कार्यकर्त्यांना भेटल्याचे काल समजले. दुसऱ्या दिवशी याच खुर्चीवरून कामे आटोपून दादा बारामतीकडे निघाले. गेले तीन दिवस मनात शंकेचं काहूर आहे. प्रश्नांचा आगडोंब उसळतोय. मृत्यूचे राजकारण करण्याचं पाप मी तरी करणार नाही. मात्र, हे प्रश्न माझं मन विचारतंय”

अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात पाच मृतदेहच का सापडले? सहावी व्यक्ती कुठे गेली? Take-off आधी प्रवासी यादी digitally नोंदलेली असते, मग विसंगती का? एखादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही? एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले? प्रश्न विचारणं म्हणजे अफवा नाही, असेही अमोल मिटकरी यांनी स्पष्ट केले.

विमानाची निवड कोणी व कोणत्या निकषांवर केली?

उपमुख्यमंत्रीसारख्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तीसाठी अपघात व सुरक्षा दोषांचा इतिहास असलेल्या Learjet 45 विमानाची निवड कोणी व कोणत्या निकषांवर केली? तसेच अहवालांनुसार पूर्वी अल्कोहोल-संबंधित कारणांवर शासकीय कारवाई व निलंबनाची नोंद असलेल्या पायलट सुमित कपूर यांची ऐनवेळी नियुक्ती कोणाच्या निर्णयाने आणि कोणत्या मेडिकल-फिटनेस, सेफ्टी क्लिअरन्सवर करण्यात आली? याबाबत सविस्तर तांत्रिक स्पष्टीकरण काय? असेही प्रश्न अमोल मिटकरी यांनी उपस्थित केले आहेत. एकूणच अजित पवार यांचे विमान अपघात प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात असून चौकशीची मागणी केली जात आहे.