लोकसत्ता टीम

नागपूर : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यामुळे ते दररोज माध्यमांसमोर वायफळ बडबड करीत असतात. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांचे एखाद्या चांगल्या रुग्णालयात उपचार करावा, असा उपरोधिक सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष व प्रवक्ता वेदप्रकाश आर्य यांनी दिला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नागपुरात शरद पवारांवर टीका करताना ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षणाशी केंद्र सरकारचा संबंध नाही. याबाबत राज्याने निर्णय घ्यायचा आहे. शरद पवार एवढे दिवस सत्तेत होते. त्यांची नेहमी मराठा आरक्षणाविरोधात भूमिका राहिली आहे. त्यांच्या सरकारमधील जीआर पाहिले तर त्यावेळीही मराठा समाजाला त्यांना आरक्षण देता आले असते. मराठा समाजाला मोठ्या प्रमाणात मागासवर्गीयांसारख्या सवलती देता आल्या असत्या. पण मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शरद पवार यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही आणि आता मराठा आरक्षणावर शरद पवार बोलत आहे, असे म्हटले होते. वेदप्रकाश आर्य यांनी आज बावनकुळे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

आणखी वाचा-गोंदिया जिल्ह्यात भाजपला मोठा झटका! माजी आमदार रमेश कुथे यांचा भाजपला ‘रामराम’

बावनकुळे राज्यातील वरिष्ठ नेत्यांविरुद्ध वाट्टेल ते बरळत असतात. महाराष्ट्र सुसंस्कृत राज्य आहे. येथे वडीलधारी व्यक्तीचा मानसन्मान केला जातो. बावनकुळे दररोज माध्यमातून वरिष्ठ नेत्यांविषयी चिखलेफेक करतात. ते सुसंस्कृत लोकांना अजिबात आवडले नाही. ते त्यांनी मतपेटीतून व्यक्त केले. बावनकुळे यांच्या अशा वक्तव्यांची किंमत भाजपला लोकसभा निवडणुकीत मोजावी लागली. भाजपचा दारुण पराभव झाला आणि आता हा पराभव बावनकुळे पचवू शकत नाहीत. ते पुन्हा विरोधी पक्षांच्या नेत्यांविरुद्ध काहीबाही बोलत सुटले आहेत. निवडणुकीतील पराजयामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असावे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी याची वेळीच दखल घ्यावी आणि बावनकुळे यांना एखाद्या चांगल्या रुग्णालयात त्यांचा उपचार करायला हवा.

आणखी वाचा-येत्या २४ तासात विदर्भात पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’

रामटेकचे माजी खासदार कृपाल तुमाने यांना उमेदवारी मिळू नये यासाठी बावनकुळे यांनी दबाव टाकला होता. त्यामुळे येथे शिंदे सेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. बावनकुळे डमी प्रदेशाध्यक्ष असून त्यांना त्यांच्याच पक्षात किंमत नाही. त्यामुळे विरोधी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांबद्दल बडबड करून प्रकाश झोतात राहण्याचा केविलवाना प्रयत्न ते करीत असतात, अशी टीकाही आर्य यांनी केली.