वर्धा : राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार व अजित पवार असे विभाजन झाले आणि कोण कुठे याची मोजदाद सूरू झाली. मोजकेच शरद पवार यांच्या पाठीशी उभे राहले. काही काळाने या दोन्ही गटाचे विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चाना उधाण आले होते.

पण अजितदादा यांच्या अपघाती निधनानंतर त्यावर पडदा पडल्याचे दिसून आले. पण आता सर्व ताकदीनीशी पुन्हा नव्याने बांधणी करायची म्हणून शरद पवार गट कामाला लागल्याच्या घडामोडी आहेत. नवा गडी, नवा राज, असे सूत्र असल्याचे चित्र उमटले.

अशा आहेत घडामोडी

NCP शरद पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे हे गत एक आठवड्यापासून या कार्यात असल्याचे सांगण्यात आले. नवे पदाधिकारी नेमणे सूरू झाले आहे. पण प्रामुख्याने युवा व महिला शाखा सशक्त करण्याची भूमिका आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युवा व नवे चेहरे देण्याचे धोरण पुढे करण्यात आले आहे. राज्यभरातील असे युवा नेते मुंबईत मुलाखतीस बोलावल्या जात आहे.

नव्या नेमणुका

प्रदेश कार्यकारिणी अध्यक्ष शिंदे यांनी आधीच घोषित केली आहे. आता केवळ दोन चेहरे नव्याने सामावून घेण्यात आले आहे. त्यात खदखद फेम म्हणून परिचित नीतेश कराळे उर्फ मास्तर यांना प्रदेश चिटणीस म्हणून नियुक्ती मिळाली आहे. तसेच माजी जिल्हाध्यक्ष सुनील राऊत यांची सरचिटणीस म्हणून प्रदेश कार्यकारिणीत वर्णी लागली आहे.

प्रवक्तेपद कराळे यांना

या घडामोडीत Karale Master यांना चिटणीस या पदासोबतच प्रवक्ता म्हणून पण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पक्षाचे प्रवक्तेपद अलीकडे खूप महत्वाचे समजल्या जात आहे. या पदावर कार्य करणारे विविध पक्षाचे नेते थेट राज्यसभा किंवा विधान परिषदेत नियुक्त झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. म्हणून कराळे ही नियुक्ती महत्वाची मानतात.

कराळे उपयुक्तता

Corona काळात सर्व ठप्प असतांना कराळे यांनी ऑनलाईन माध्यमातून शिकवणी वर्ग सूरू केले आणि ते चांगलेच लोकप्रिय झाले. समाजमाध्यम ( Social Media Influencer ) हे साधन करीत त्यांनी विविध प्रश्न मांडणे सूरू केले. पुढे थेट राजकीय भूमिका घेत प्रखर भाजप विरोधक म्हणून त्यांची चर्चा सूरू झाली. महाआघाडीचे ते खंदे प्रचारक झाल्याने त्यांना लोकसभा व विधानसभा निवडणुकीत खुद्द शरद पवार यांनी भाषणासाठी संधी देणे सूरू केले होते.

आता प्रवक्ते

या माध्यमातून त्यांना खदखद कराळे मास्तर अशी ओळख मिळाली. त्याचा त्यांनी प्रचारात चतुराईने वापर करून घेतला. तेच हेरून त्यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाने प्रवक्तेपदी नेमल्याचे पक्षात बोलल्या जात आहे. ते मैदानी राजकारणापेक्षा व्यासपीठ गाजवू शकतात, म्हणून ही संधी असावी असे मत ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केले. प्रश्नांना उत्तर देणे, नकारात्मक स्थितीत पक्षाचे प्रतिमा संवर्धन, जनता व पक्ष यातील दुवा, पक्षीय धोरणाची अधिकृत भूमिका मांडणे ही जबाबदारी ते आता पार पाडतील.

मास्तर म्हणतात…

या नव्या नियुक्तीचे श्रेय कराळे हे पक्षाध्यक्ष शरद पवार यांना देतात. ते म्हणाले की या पदाच्या माध्यमातून राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसची चांगली प्रतिमा लोकांत नेण्याचे काम मी करणार. युवकांना जोडणार. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत नवे चेहरे देण्याची भूमिका पक्ष नेतृत्वाची आहे. मी तसेच प्रदेश सरचिटणीस सुनील राऊत व जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले असे मिळून पक्ष मजबूत करू मुंबईत काही दिवस देत पक्ष धोरणावर बोलणार. शरद पवार यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवू, असे कराळे म्हणाले.