खोट्या केसेस करुन सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न, पण मी भीक घालणार नाही – शरद पवार

“सरकार हे शेतकरी व कामगार विरोधी असून उद्योगपतींची करोडो रुपयांची कर्ज माफ करून कष्टकरी शेतकऱ्यांना मात्र देशोधडीला लावत आहे”

(संग्रहित छायाचित्र)

लोकसत्ता ऑनलाइन, वर्धा

विद्यमान केंद्र व राज्य सरकार हे शेतकरी व कामगार विरोधी असून उद्योगपतींची करोडो रुपयांची कर्ज माफ करून कष्टकरी शेतकऱ्यांना मात्र देशोधडीला लावत आहे असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज हिंगणघाट येथील विशाल जाहीर सभेत बोलताना केला. गोकुळधाम मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार राजू तिमांडे यांच्या निवडणूक प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत बोलत होते.

“आज महाराष्ट्रातील १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, परंतु त्याविषयी कोणती उपाययोजना करायला सरकारला वेळ नाही. केवळ आपल्या विरोधकांना संपविण्यासाठी त्यांच्यावर खोट्या केसेस टाकून गुन्हे नोंदवण्याचे काम हे सरकार करीत आहे. मी कोणत्याही राज्य सहकारी बँकेचा सभासद किंवा संचालक नसतानाही ईडीने माझ्याविरुद्ध खोटा गुन्हा नोंदविला. ही दडपशाही आहे, परंतु या दडपशाहीला मी भीक घालणार नाही,” अशा शब्दांत शरद पवारांनी सरकारचा समाचार घेतला.

यावेळी बोलताना शरद पवार यांनी म्हटलं की, “या देशातील ७० टक्के लोक हे शेती करतात, त्यांचा विचार न करता केवळ मुठभर उद्योगपतींच्या भल्यासाठी हे सरकार काम करीत आहे. आज मुंबईसारख्या महानगरातील गिरणी उद्योग बंद करून त्याठिकाणी ४० मजली इमारती उभ्या होत आहेत. हेच षडयंत्र हिंगणघाट सारख्या शहरातही राबविण्यात येणार आहे. पुढील भविष्यात हे संकट छोट्या गावांवर येणार आहे”.

“शेती पुर्णतः नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. औद्योगिकरण पूर्णतः ठप्प पडलेले असल्याने बेरोजगारांना काम नाही. येणारी तरुणपिढी ही कामासाठी वणवण भरकटत जाणार आहे. विकासाच्या नावावर सर्वत्र अनागोंदी कारभार सुरू आहे. सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम सरकारचे आहे, परंतु आज सरकार नावाची यंत्रणा ही उद्योगपतींची वेठबिगार झाली आहे. देशात जिथे जिथे भाजपाचे राज्य आहे त्याठिकाणी गुन्हेगारी वाढली आहे. स्त्रियांवरील अत्याचारात वाढ झाली आहे हे चित्र अतिशय विदारक आहे. आज देशात मुख्यमंत्र्यांचे शहर असलेले नागपूर हे गुन्हेगारीत नंबर एक वर आहे. एवढी मोठी  बेइज्जती आजवर कधीच झाली नव्हती,” अशी टीका शरद पवार यांनी केली आहे.

“राज्य तुमच्या हातात दिले परंतु संपूर्ण महाराष्ट्रातील एकाही गावाचा रस्ता ठीक नाही. सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य आहे. खड्डेयुक्त महाराष्ट्राची ओळख होत असून ही स्थिती बदलण्याची आज गरज आहे. लोकांचे आर्थिक जीवनमान सुधरावयाचे आहे, त्यासाठी कारखानदारी नव्याने सुरू करून शेतीला पुनर्जिवित करण्याची गरज आहे, तरच तरुण पिढीचे भविष्य उज्वल व सुरक्षित होईल,” असंही यावेळी शरद पवारांनी सांगितलं.

“सत्तेचा गैरवापर राज्यकर्त्यांकडून सुरू आहे. महिला, बेरोजगार, युवक, कामगार, शेतकरी कोणीही या राज्यात सुरक्षित नाही. शिवछत्रपतींचे नाव घेणारे लोक महिलांची सुरक्षितता करू शकत नाही. छत्रपतींनी आदर्श कारभाराने सर्व समाजाला एक आदर्श राज्यव्यवस्था दिली. त्याचे उल्लंघन हे सरकार करीत आहे. यांना धडा शिकविण्याची हीच खरी वेळ आहे,” असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ncp sharad pawar wardha rally maharashtra assembly election sgy 87

ताज्या बातम्या