NEET exam AI cheating Case : गडचिरोली : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय परीक्षा एजन्सीमार्फत घेण्यात आलेल्या ‘नीट’ परीक्षेत गडचिरोली शहरात काही विद्यार्थ्यांकडून सुरक्षेला खिंडार पडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

कडक तपासणी आणि त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणेला गुंगारा देत दोन विद्यार्थ्यांनी थेट परीक्षा केंद्रात मोबाइल नेल्याचे उघडकीस आले असून, यातील एका विद्यार्थ्याने चक्क ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’च्या (एआय) मदतीने प्रश्नांची उत्तरे मिळवल्याचे निष्पन्न झाले आहे. ३ मे रोजी घडलेल्या या खळबळजनक प्रकारामुळे जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवरील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, याप्रकरणी दोन विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शहरातील धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयाच्या केंद्रावर (क्र. ३१२५१०२) एकूण ३६० विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था होती. परीक्षा सुरू असताना दुपारी ३.४० च्या सुमारास खोली क्र. ६ मधील पर्यवेक्षक राजेश पाटील आणि राखी मुधोळकर यांना चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथील एका २० वर्षीय विद्यार्थिनीच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. तिची सखोल तपासणी केली असता, तिच्या वस्त्रांमध्ये लपवून ठेवलेला आकाशी रंगाचा मोबाइल मिळून आला. धक्कादायक बाब म्हणजे, या विद्यार्थिनीने चालू वर्षाचा पेपर आपल्या वस्त्रात लपवला होता आणि जुन्या वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचे मुख्य पान जोडून निरीक्षकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता.

दुसरी घटना गोकुळनगर येथील शिवाजी महाविद्यालय केंद्रावर (क्र. ३१२५१०१) घडली. येथे आष्टी येथील एका १७ वर्षीय विद्यार्थ्याने चक्क हायटेक तंत्रज्ञानाचा अवलंब करत कॉपीचा प्रयत्न केला. दुपारी २.२७ च्या सुमारास पर्यवेक्षक मनीष बानबले यांनी या विद्यार्थ्याला मोबाइलसह रंगेहात पकडले. परीक्षेची वेळ संपल्यानंतर या मोबाइलची तांत्रिक तपासणी केली असता, त्यातील गॅलरीमध्ये प्रश्नपत्रिकेचे फोटो आढळून आले. विशेष म्हणजे, या विद्यार्थ्याने ‘एआय’ला प्रश्न पाठवून त्याद्वारे उत्तरे मिळवल्याचे चॅटिंगवरून स्पष्ट झाले आहे. तंत्रज्ञानाचा असा विघातक वापर पाहून पोलीस प्रशासनही थक्क झाले आहे.

‘नीट’ परीक्षेसाठी चप्पल, दागिने, केसांच्या पिना अशा साध्या वस्तूंनाही मनाई असताना, हे विद्यार्थी सुरक्षा भेदून मोबाइलसह आत शिरलेच कसे, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहे. या प्रकारामुळे केंद्रप्रमुखांच्या आणि तपासणी यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर संशय व्यक्त केल्या जात आहे. या दोन्ही प्रकरणांत केंद्रप्रमुख राजकुमार नंदागवळी आणि अरुण मुनघाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गडचिरोली पोलिसांनी नवीन ‘सार्वजनिक परीक्षा कायदा २०२४’ मधील कलम ३ आणि इतर कलमान्वये दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवले आहेत. जप्त केलेले मोबाइल आणि चित्रीकरण पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचे धागेदोरे आहेत का, याचा तपास सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे करत आहेत.