नागपूर : NEET (नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट) परीक्षा आणि विद्यार्थी आत्महत्या हे भारतातील अत्यंत गंभीर आणि संवेदनशील प्रकरण आहे. लाखो विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न पाहतात, मात्र प्रचंड स्पर्धा, पेपरफुटीचे आरोप आणि परीक्षा रद्द झाल्यामुळे वाढलेला मानसिक ताण यामुळे अनेक विद्यार्थी टोकाचे पाऊल उचलत आहेत. यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी अप्रत्यक्षपणे विद्यार्थ्यांना सल्ला दिला आहे.
“बारावीच्या परीक्षेत नापास झाल्यानंतर आत्महत्या करणे, घरात रागावल्यावर घर सोडून जाणे किंवा टोकाचे पाऊल उचलणे, अशा घटना चिंताजनक आहेत. तरुण पिढी जीवनातील आव्हानांचा सामना करण्यास सक्षम होईल, अशी मानसिकता घरातून आणि समाजातून घडवण्याची गरज आहे,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी रविवारी नागपुरात केले.
कथा पूर्वी मुलांना मानसिक बळ देत होत्या
नागपुरातील ‘सनमार्ग’ माइंड वेलनेस सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मानसिक आरोग्य आणि भारतीय संस्कार यांचा परस्परसंबंध स्पष्ट करताना भागवत यांनी महाभारतातील पांडवांचे उदाहरण दिले. लहानपणापासून अनेक संकटांना सामोरे जाऊनही पांडवांनी खंबीरपणे त्यांचा सामना केला. अशा कथा पूर्वी मुलांना मानसिक बळ देत असत. मात्र, आज त्या कथांचा प्रभाव समाजात कमी झाल्याचे दिसून येते, असे त्यांनी सांगितले.
ही पद्धत संपल्याने अडचण
“पूर्वी आजी-आजोबा मुलांना बसवून रामायण-महाभारताच्या कथा सांगायचे. आज संयुक्त कुटुंबपद्धती कमी झाली आहे. अनेक घरांत आजी-आजोबा वेगळे राहतात. पालकांनाही या कथा सांगण्याइतका वेळ किंवा माहिती नसते. त्यामुळे रडणाऱ्या मुलाच्या हातात लहानपणापासून मोबाईल दिला जातो. त्याचे परिणाम काय होतील, याचा विचार आपण केला का?” असा सवालही भागवत यांनी उपस्थित केला.
जबाबदारी केवळ डॉक्टरांची नाही
नव्या पिढीला संवादाची गरज असल्याचे सांगताना त्यांनी मुलांमध्ये वाढणाऱ्या एकटेपणाबाबत चिंता व्यक्त केली. “मुलांकडून चुका होत असतील तर त्यामागे मोठ्यांच्याही काही चुका असतात. त्यामुळे घर, शाळा, महाविद्यालय आणि समाज या सर्व स्तरांवर मुलांना जीवनातील वास्तवाचा सामना करण्यासाठी तयार करणे आवश्यक आहे. मानसिकदृष्ट्या सक्षम समाज घडविण्याची जबाबदारी केवळ डॉक्टरांची नाही, तर पालक आणि ज्येष्ठ पिढीचीही आहे,” असे ते म्हणाले.
मानसिक आरोग्याचा प्रश्न व्यापक
देशातील सर्व मानसोपचारतज्ज्ञ या कामाला लागले तरी मानसिक आरोग्याचा प्रश्न इतका व्यापक आहे की केवळ वैद्यकीय यंत्रणेमुळे तो सुटणार नाही. मुलांना संकटातून सावरण्याची क्षमता विकसित करणे ही कुटुंब आणि समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी भागवत यांनी ‘सनमार्ग’ रुग्णालयाच्या उपक्रमाचे कौतुक करत सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले.
भारतीय ज्ञानपरंपरा आणि आधुनिक मानसशास्त्राची सांगड आवश्यक
आधुनिक मानसशास्त्राचा पाया पाश्चिमात्य विचारांवर उभा असला तरी भारतीय परंपरेत मनाच्या अभ्यासाची समृद्ध परंपरा आहे, असे भागवत म्हणाले. Patanjali यांचे ‘योगसूत्र’ आणि ‘योगवासिष्ठ’ यांसारख्या ग्रंथांमध्ये मनाच्या विज्ञानाचा सखोल अभ्यास आढळतो. त्यामुळे आधुनिक मानसशास्त्राबरोबर भारतीय ज्ञानपरंपरेचे एकत्रीकरण करून अधिक व्यापक आणि प्रगत भारतीय मानसशास्त्र विकसित करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
