अकोला : नीट पेपरफुटी प्रकरणात मनसेने सोमवारी अकोल्यात आक्रमक भूमिका घेतली. या प्रकरणांत आरसीसी कोचिंग क्लासचे शिवराज मोटेगावकर याला सीबीआयने ताब्यात घेतले. शिकवणी वर्गाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने तीव्र आंदोलन केले. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या अशा प्रवृत्तीविरोधात मनसेने आक्रमक होत क्लासचे फलक व मोटेगावकर याच्या प्रतिमेला काळे फासण्यात आले. संबंधित फलक फाडून निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनामुळे चांगलीच खळबळ उडाली होती.
पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे
देशभरात सध्या ‘नीट’ (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणाने मोठी खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आता महाराष्ट्रात आणि विशेषतः लातूरमध्ये वेगाने पोहोचले आहेत. या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) लातूरमधील ‘आरसीसी’ (RCC) कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर याला चौकशीनंतर ताब्यात घेतले. सीबीआयचे पथक गेल्या काही दिवसांपासून लातूरमध्ये ठाण मांडून आहे. दोन दिवसांपूर्वीच सीबीआयने मोटेगावकर याच्या शिकवणी वर्गाच्या कार्यालयावर छापा टाकून अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली होती. त्यानंतर शिवराज मोटेगावकर याची कसून चौकशी सुरू होती. अखेर दीर्घ चौकशीनंतर सीबीआयने ही मोठी कारवाई करत त्याला ताब्यात घेतले आहे. शिवराज मोटेगावकर हे शैक्षणिक वर्तुळात मोठे नाव असून महाराष्ट्रातील विविध शहरांत त्याच्या क्लासच्या शाखा आहेत.
विद्यार्थ्यांचे पैसे परत करा व शाखा कायम स्वरुपी बंद करा
‘आरसीसी’ (RCC) कोचिंग क्लासेसची अकोल्यात शाखा आहे. याठिकाणी विद्यार्थ्यांकडून अवाढव्य शुल्क आकारल्या जात असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. त्यातच आता ‘नीट’ (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणात शिवराज मोटेगावकर याचे नाव आल्याने मनसेने आक्रमक होत आंदोलन केले.
क्लासेसच्या फलकाची तोडफोड करून मोटेगावकर याच्या छायाचित्राला काळे फासले. येत्या आठ दिवसांत विद्यार्थ्यांचे संपूर्ण पैसे परत करण्यात यावेत तसेच आरसीसी कोचिंग क्लासेस कायमस्वरूपी अकोल्यातून बंद करण्यात यावेत, अन्यथा मनसेच्यावतीने आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिकवणी वर्ग प्रशासनाला देण्यात आला. हे आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संपर्क अध्यक्ष हेमंत गडकरी यांच्या नेतृत्वाखाली तसेच शहराध्यक्ष सौरभ भगत, मनविसे जिल्हाध्यक्ष रणजीत राठोड यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी आंदोलनात उपशहर अध्यक्ष मुकेश धोंडफळे, तालुका अध्यक्ष सौरभ फाले, विजय बोचरे, नीलेश स्वर्गीव, नारायण मेहरे आदी सहभागी झाले होते.
