नागपूर : नीट पेपर फुटीचे प्रकरण समोर आले. याप्रकरणी आतापर्यंत अनेकांना अटक करण्यात आली असली तरी यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. पेपरफुटीमुळे केंद्र सरकराची चांगलीच नाचक्की झाली. उच्च शिक्षण मंत्री धर्मेद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी तरुण रस्त्यावर उतरले. आता २१ जूनला नीटची पुनर्परीक्षा होत आहे. सावधगिरी म्हणून वायुसेनेच्या मदतीने प्रश्नपत्रिका संबंधित जिल्ह्यांच्या ठिकाणी पोहोचवण्यात आल्या, तर केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) जवान व पोलीस दलाच्या सुरक्षेत या प्रश्नपत्रिका संबंधित परीक्षा केंद्रांवर पोहचवण्यात येणार आहे.

अधिक सावधगिरी

देशभर नीट पेपर फुटीचा परिणाम दिसून आला. विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यांनी घेतलेली मेहनत वाया गेल्याचे बोलल्या जात आहे. पालकांचा खर्च व्यर्थ गेल्याचे बोलल्या जात आहे. अनेक विद्यार्थी नैराश्यात गेले. यातूनच काहींनी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलले. पेपर पुन्हा फुटता कामा नये म्हणून आता अधिक सावधगिरी बाळगण्यात येत आहे. त्यामुळे पेपर वायुसेनेच्या मदतीने जिल्ह्याच्या ठिकाणी आणण्यात आले. तर जिल्ह्यातून संबंधित केंद्रावर मोठ्या सुरक्षा व्यवस्थेत पाठवण्यात येणार आहे.

आवश्यक सुविधा व केंद्रांबाबतचा आढावा

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नीट पुनर्परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुरक्षा, आवश्यक सुविधा व केंद्रांबाबतचा आढावा घेतला. यात सीआरपीएफ, सीआयएसएफ, पोलीस, वाहतूक, आरोग्य व संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते. ही परीक्षा जिल्ह्यात ३० केंद्रांवर होत आहे. प्रथमच सीआरपीएफ व पोलीस सुरक्षेत प्रश्नपत्रिका संबंधित केंद्रांवर पोहचवण्यात येतील. त्यासाठी वाहन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे रुग्णवाहिका आणि पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पेपरफुटीच्या दृष्टिकोनातून गुप्तताही बाळगण्यात येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रश्नपत्रिकेचे तीन संच तयार करण्यात आले आहे. कोणती प्रश्नपत्रिका कोणत्या केंद्रावर जाईल, हे त्याच दिवशी सांगण्यात येईल.