वर्धा: वैद्यकीय शाखेत माझा मुलगा / मुलगी शिकले पाहिजे, हे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते. म्हणुन नाना कोचिंग क्लास या पाल्यासाठी लावले जातात. पुढे परीक्षा होते. आणि नंतर प्रवेश. पण कोणत्या वैद्यकीय महाविद्यालयात आपला पाल्य प्रवेश घेऊ शकतो, हे बहुसंख्य पालकांना माहीतच नसते. म्हणुन समुपदेशन ही प्रक्रिया. ती कशी याचे हे उत्तर.

महत्वाची अशी ही घडामोड

देशभरातील वैद्यकीय (MBBS) आणि दंतवैद्यकीय (BDS) महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. वैद्यकीय समुपदेशन समितीने ‘नीट युजी २०२६’ (NEET UG 2026) साठीच्या समुपदेशनाचे वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार समुपदेशनाची नोंदणी प्रक्रिया येत्या ५ ऑगस्टपासून प्रत्यक्ष सुरू होणार आहे.

राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET UG) उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना आता ऑल इंडिया कोटा (AIQ), केंद्रीय आणि डीम्ड विद्यापीठे, तसेच AFMC मधील जागांसाठी ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. ही नोंदणी प्रक्रिया MCC च्या अधिकृत संकेतस्थळावर पार पडेल.

समुपदेशन प्रक्रिया आणि असे टप्पे

एमसीसीद्वारे जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार समुपदेशन प्रक्रिया एकूण विविध टप्प्यांमध्ये राबवली जाईल.

१.नोंदणी आणि शुल्क भरणे – ५ ऑगस्टपासून इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरून नोंदणी शुल्क जमा करावे लागेल.

२.पर्याय निवडणे आणि लॉक करणे – उमेदवारांना त्यांच्या आवडीनुसार महाविद्यालये आणि अभ्यासक्रमांचे पर्याय निवडावे लागतील. दिलेल्या मुदतीत हे पर्याय लॉक करणे अनिवार्य असेल.

३.जागा वाटप – विद्यार्थ्यांनी नोंदवलेले गुण, श्रेणी आणि दिलेल्या पर्यायांच्या आधारे एमसीसीद्वारे जागा वाटपाची यादी जाहीर केली जाईल.

४.महाविद्यालयात रिपोर्टिंग – जागा निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांना दिलेल्या कालावधीत संबंधित महाविद्यालयात जाऊन कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चित करावा लागेल.

विद्यार्थ्यांसाठी काही सूचना

प्रवेश प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी उमेदवारांनी आपली सर्व मूळ कागदपत्रे (उदा. नीट प्रवेशपत्र, गुणपत्रिका, जातीचा दाखला, ओळखपत्र इत्यादी) तयार ठेवावीत. नोंदणी करताना दिलेली माहिती अचूक असावी, तसेच पासवर्ड आणि आयडी सुरक्षित ठेवावा, असे आवाहन एमसीसीने केले आहे.

वैद्यकीय प्रवेशाची वाट पाहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी ही प्रक्रिया अत्यंत निर्णायक ठरणार आहे. समुपदेशनाचे सविस्तर वेळापत्रक, नियम आणि अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी नियमितपणे MCC च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.