NEET UG 2026: नागपूर : ‘नीट (यूजी) २०२६’ परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने प्रथमच देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या सुट्टीवर निर्बंध घालत २ व ३ मे रोजी सुट्टी न देण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, बहुतांश एमबीबीएस विद्यार्थी आधीच उन्हाळी सुट्टीवर गेले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना परत बोलावणार का? हा प्रश्न अनुत्तरित आहे.

‘एनएमसी’ने २३ एप्रिल रोजी जारी केलेल्या सूचनेत केंद्राच्या उच्च शिक्षण विभागाने नीट (यूजी)बाबत काढलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन करण्यास सांगितले. परीक्षेची विश्वासार्हता अबाधित राखण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहनही सूचनेत आहे. मागील काही वर्षांत ‘नीट (यूजी)’ परीक्षेदरम्यान गैरप्रकार उघड झाल्याच्या पार्श्वभूमीवर यंदा वैद्यकीय महाविद्यालयांनी अधिक दक्षता बाळगण्याचे निर्देश दिले आहे. तसेच, वैद्यकीय महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना कोणत्याही अनुचित कृत्यांपासून दूर राहण्याबाबत जागरूक करावे आणि परीक्षेच्या प्रक्रियेला बाधा आणणाऱ्या बाबींमध्ये सहभागी होऊ नये, याबाबत माहिती द्यावी, असेही सूचनेत नमूद आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून २ व ३ मे २०२६ रोजी विद्यार्थ्यांना सुट्टी न देण्याचा सल्ला देण्यात आला असून, केवळ अत्यावश्यक कारण असल्यासच सुट्टी मंजूर करण्यास सांगितले आहे.

पेच काय ?

दरम्यान, नागपूरसह राज्यातील अनेक शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतील पदवी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आणि निम्मे शिक्षक आधीच उन्हाळी सुट्टीवर गेले आहेत. नियमानुसार सुट्टीवरील शिक्षक परतल्यावर शिल्लक निम्मे शिक्षक सुट्टीवर जातील. त्यामुळे घरी गेलेल्या वैद्यकीयच्या विद्यार्थ्यांना परत महाविद्यालयात बोलवायचे काय? हा पेच महाविद्यालयांपुढे निर्माण झाला आहे.

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे पत्र संबंधित उपअधिष्ठात्यांना पाठवून विद्यार्थ्यांमध्ये ‘नीट (यूजी)’ परीक्षेबाबत जनजागृती करण्यात आली आहे. सध्या विद्यार्थी उन्हाळी सुट्टीवर असल्याने त्यांचा या प्रक्रियेशी थेट संबंध येण्याची शक्यता नाही. – डॉ. रवी चव्हाण, अधिष्ठाता, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर.

‘नीट (यूजी) परीक्षा’ म्हणजे काय?

‘नीट (यूजी)’ ही देशातील वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांसाठीची एकमेव राष्ट्रीय प्रवेश परीक्षा आहे. ही परीक्षा राष्ट्रीय परीक्षा संस्था आयोजित करते. एमबीबीएस, बीडीएस तसेच इतर आरोग्यविषयक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी ही परीक्षा आवश्यक असते. देशभरातील शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश या परीक्षेतील गुणांवर दिला जातो. विद्यार्थ्यांची गुणवत्ता, पारदर्शकता आणि एकसमान निकष राखण्यासाठी ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची मानली जाते.