नागपूर : वैद्यकीय क्षेत्रात करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांना नीट परीक्षेची वाट असते. दहावीचे वर्ष पूर्ण होताच विद्यार्थी नीट परीक्षेच्या तयारीला सुरुवात करतात. दोन वर्षांच्या प्रचंड मेहनतीनंतर विद्यार्थी ही परीक्षा देतात.
दरवर्षी भारतात जवळपास पंधरा ते वीस लाख विद्यार्थी नीट परीक्षा देतात. यातून केवळ एका लाख जागांवरच प्रवेश दिला जातो. त्यामुळे नीट परीक्षेमध्ये प्रचंड स्पर्धा दिसून येते. वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे.
नीट यूजी २०२६ (National Eligibility cum Entrance Test, Undergraduate) ची अधिकृत अधिसूचना जाहीर झाली असून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ http://www.neet.nta.nic.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ८ मार्च २०२६ निश्चित करण्यात आली आहे.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटवर जाऊन “रजीस्टेशन फॉर नीट यूजी २०२६” या लिंकवर क्लिक करावे. त्यानंतर स्वतःची नोंदणी पूर्ण करून अर्ज भरावा. सर्व तपशील अचूक भरल्यानंतर अर्ज जमा करावा. अर्ज सादर केल्यानंतर ते पान डाउनलोड करून त्याची प्रिंटआउट भविष्यातील वापरासाठी जतन करून ठेवावी.
अर्ज शुल्काबाबतही महत्त्वाची माहिती जाहीर करण्यात आली आहे. सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क १७०० रुपये आहे. ईडब्लूएस आणि ओबीसी उमेदवारांसाठी १६०० रुपये शुल्क आकारले जाईल. एससी, एससटी, पीडब्लूबीडी आणि तृतीयपंथी उमेदवारांसाठी अर्ज शुल्क १००० रुपये ठेवण्यात आले आहे. परदेशी उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ९५०० रुपये आहे.
परीक्षेची तारीख देखील निश्चित करण्यात आली आहे. अधिकृत माहितीनुसार नीट यूजी २०२६ परीक्षा ३ मे २०२६ रोजी आयोजित केली जाणार आहे. परीक्षेची एकूण कालावधी १८० मिनिटे (तीन तास) असेल. परीक्षा दुपारी दोन वाजता सुरू होऊन सायंकाळी पाच वाजता समाप्त होईल. उमेदवारांनी सर्व सूचना काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.
तसेच पुढील माहिती, प्रवेशपत्र परीक्षा केंद्राची माहिती आणि इतर महत्त्वाच्या सूचनांसाठी अधिकृत वेबसाइटला नियमित भेट देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील करिअरची दिशा ठरवणारी ही महत्त्वाची परीक्षा असल्याने वेळेत आणि अचूक अर्ज करणे अत्यावश्यक आहे.
