नागपूर: दिल्लीमधील जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलनानंतर ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या (एआयएसए) अध्यक्षा नेहा बोरा या चांगल्याच प्रसिद्धीमध्ये आल्या आहेत. यानंतर त्या विविध शहरांमध्ये सब याद रखा जायेगा हा कार्यक्रम घेऊन सत्तेत असलेलं भारतीय जनता पक्षावर टीका करून भाजपला सत्तेतून दूर करा असे आवाहन जनतेला करत आहे. यामुळे नेहा बोरा यांच्या राजकीय प्रवासाची चर्चा सुरू झालेली आहे. लोकसत्ता कार्यालयाला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या पुढील राजकीय प्रवासाविषयी माहिती दिली.

नेमके काय म्हणाल्या नेहा बोरा

आपल्या पुढील राजकीय वाटचाली विषयी सांगताना नेहा बुरा म्हणाले की, मी राजकीय चळवळीमध्येच आहे. त्यामुळे राजकारणात जाणार हे निश्चित आहे. २०१९मध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये पक्षांने जर संधी दिली तर निवडणुकीला सामोरे जाईल असेही त्या म्हणाल्या. राहुल गांधी यांच्यासोबत जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलनानंतर भेट झाली होती. मात्र यावेळी कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. त्यामुळे आगामी काळात निवडणूक लढवायची असेल तर ती डाव्या विचाराच्या पक्षाकडूनच लढवणार असे नेहा बोरा म्हणाल्या.

आयआयटीमधील वाढत्या आत्महत्या चिंतेचा विषय

लोकसत्ता’ कार्यालयाला दिलेल्या मुलाखतीत बोरा यांनी देशातील विद्यार्थी चळवळी, शिक्षण व्यवस्थेतील बदल, बेरोजगारी आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर भूमिका मांडली. देशातील विविध राज्यांमध्ये विद्यार्थी चळवळी सुरू असून या पार्श्वभूमीवर संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना संघटित करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवलेल्या महाराष्ट्रातच शिक्षण क्षेत्रासमोर अनेक गंभीर प्रश्न असल्याचे बोरा यांनी सांगितले. ‘आयआयटी’सारख्या महत्त्वाच्या संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत असून त्यामागे जातीय संघर्षासह विविध सामाजिक कारणे असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर व्यापक चळवळ उभी राहण्यासाठी त्यांना प्रेरणा आणि व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आवाजाला हाक देण्याचा प्रयत्न सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना व्यापक सामाजिक प्रश्नांशी जोडून देशभरात विद्यार्थी चळवळ उभी करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

शिक्षण व्यवस्थेत खासगीकरणाला वाव

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर टीका करताना शिक्षण संस्थांवरील त्यांचा प्रभाव वाढत असल्याचा आरोपही बोरा यांनी केला. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांना वाकवून अथवा डावलून अपात्र व्यक्तींच्या नियुक्त्या केल्या जात असल्याने पात्र आणि तज्ज्ञ व्यक्तींवर अन्याय होत आहे, असा आरोप त्यांनी केला. परिणामी शिक्षण व्यवस्थेची गुणवत्ता खालावत असल्याचे त्या म्हणाल्या. नवीन शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे आणि रोजगाराभिमुख शिक्षण देण्याऐवजी इतर उपक्रमांवर भर दिला जात आहे. शिक्षणाच्या वाढत्या खासगीकरणामुळे सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणे भविष्यात अधिक कठीण होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.