नागपूर : शिक्षण व्यवस्थेची होत असलेली घसरण, विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि युवकांमधील वाढता असंतोष या मुद्द्यांवर आयोजित करण्यात आलेल्या ‘Resistance – सब याद रखा जाएगा!’ या कार्यक्रमाला नागपुरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गुरुवारी सायंकाळी वसंतराव देशपांडे सभागृहात सुरू झालेल्या या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी, युवक आणि नागरिक उपस्थित झाले असून सभागृह पूर्ण भरले आहे. आसनव्यवस्था अपुरी पडल्याने अनेकांना उभे राहून कार्यक्रम ऐकावा लागत आहे.

‘या’ मुद्यावर भाषण

AISAच्या राष्ट्रीय अध्यक्षा नेहा बोरा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम सुरू झाला. शिक्षण व्यवस्था, वाढते शैक्षणिक व्यापारीकरण, युवकांसमोरील आव्हाने तसेच लोकशाही मूल्यांवरील वाढता दबाव या मुद्द्यांवर कार्यक्रमात विचारमंथन केले जात आहे. देशभरातील युवकांमध्ये विविध सामाजिक आणि सार्वजनिक प्रश्नांबाबत निर्माण झालेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील विद्यार्थी आणि युवकांनी या कार्यक्रमाला दिलेला प्रतिसाद लक्षवेधी ठरला आहे. शिक्षण आणि युवकांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी आयोजित या कार्यक्रमात बोरा सद्य शिक्षणव्यवस्था आणि देशातील सामाजिक-राजकीय परिस्थितीवर आपले विचार मांडणार आहेत.

बाहेरही गर्दी

दरम्यान, सभागृहातील आसनव्यवस्था पूर्ण भरल्यानंतर बाहेरही नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. विद्यार्थी, युवक, पालक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध नागरी समाज संघटनांचे प्रतिनिधी कार्यक्रमाला उपस्थित आहेत. कार्यक्रमात भाषणांसोबतच गाणी, सांस्कृतिक सादरीकरणे आणि नाट्यप्रयोगही होणार आहेत. त्यामुळे शिक्षण आणि युवकांच्या प्रश्नांवरील चर्चेला सांस्कृतिक अभिव्यक्तीची जोड मिळणार आहे.

लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

विदर्भ छात्र संयुक्त समितीच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद नागपुरातील विद्यार्थी आणि युवकांमध्ये शिक्षण व्यवस्थेतील प्रश्नांविषयी असलेली अस्वस्थता अधोरेखित करणारा असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.