नागपूर : लग्नाचे आमिष दाखवून शेजारी राहणाऱ्या १५ वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. अमितेश आशीष श्रीवास (२७, गिट्टीखदान) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी सध्या १० वीत शिकते. ती आठवीत असतानाच आरोपी अमितेशने तिला प्रेमाच्या जाळय़ात ओढले. ‘आपण लग्न करू, सुखाचा संसार असेल, मुंबईत घर घेऊ’ असे पूर्ण न होणारे स्वप्न तिला दाखवले. ती त्याच्या जाळय़ात अलगद अडकली. अमितेशने १८ मे २०२० रोजी तिला आपल्या घरी बोलावले. लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. गेल्या दोन वर्षांपासून तो तिच्याशी बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता. दहावीचे वर्ष असल्यामुळे मुलीने अमितेशकडे दुर्लक्ष केले. यामुळे चिडलेला अमितेश तिला बदनामीची धमकी देत होता. १० मे रोजी तो मुलीच्या घरी आला. त्याने तिच्याशी बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित करीत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर मुलीने आईला घेऊन जरीपटका पोलीस ठाणे गाठले. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.
