नागपूर : उपराजधानीतील युवा वर्ग पुन्हा ड्रग्सच्या आहारी जात असून महिन्याकाठी लाखों रुपयांचे ड्रग्स नागपुरात येत आहेत. ड्रग्स तस्करांनी नागपुरातून संपूर्ण विदर्भात जाळे पसरवले असून तरुण-तरुणींना पब, बार आणि हुक्का पार्लरच्या माध्यमातून ड्रग्स पोहचविण्यात येत आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ३१ लाखांची एमडी पावडर शहरातील लहान विक्रेत्यांपर्यंत पोहोचविण्यापूर्वीच जप्त केली व आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने मध्यरात्री महेंद्र नगरातील अझरुद्दीनच्या घराची झडती घेत ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. एकापाठोपाठ चार आरोपींना अटक करण्यात आली. अझरुद्दीन काझी (३७) रा. महिंद्रनगर, इरफान अहमद (२१) रा. टिमकी, नदीम खान (२४) रा. शांतीनगर आणि सय्यद सोहेल रा. नवी वस्ती टेका अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. चारही आरोपींना पाचपावली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. रविवारी दुपारी आरोपींना विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. ही सर्वांत मोठी कारवाई मानली जाते. यापूर्वी किरकोळ विक्रेतेच हाती लागायचे. आता ठोक विक्रेता हाती लागल्याने पोलिसांना मुंबईतील सूत्रधारापर्यंत पोहोचता येईल.

हेही वाचा – गडचिरोली: नक्षलवाद्यांना सात गावांत प्रवेशबंदी; दहशत झूगारून गावकऱ्यांनी घेतला ऐतिहासिक निर्णय

जुबेर शेख हा मुंबईचा रहिवासी असून, तो नागपूरसह इतरही महानगरांत अंमली पदार्थ पाठवितो. मोठ्या शहरांत त्याचे ठोक विक्रेते आहेत. त्यांच्या माध्यमातून शहरात किरकोळ विक्रेत्यांना एमडी पावरडरची विक्री केली जाते. अझरुद्दीन हा जुबेरचा खास व्यक्ती आहे. नागपुरातील मोठा ठोक विक्रेता मानला जातो. मुंबईहून सर्वांत आधी त्याच्याजवळच एमडी पावडर येत असल्याची गोपनीय माहिती एनडीपीएस पथकाला मिळाली. त्याच्याकडून इरफान, नदीम आणि सोहेल एमडी पावडर विक्रीसाठी घेऊन जाणार होते. ही ‘डिलिव्हरी’ रात्री ११ नंतर होणार असल्याचीही माहिती पथकाला मिळाली, तर सोनू हा अमरावतीला घेऊन जाणार होता. त्याने अतिकला पाठविले. अतिकने जुबेरशी संपर्क साधला. त्यानंतर नदीम हा एमडी पावडर घेण्यासाठी आला. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, उपायुक्त निमित गोयल, सहायक आयुक्त डॉ. अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने, मनोज घुरडे, सिद्धार्थ पाटील, विवेक अढाऊ, मनोज नेवारे, सूरज भानावत, शैलेश दोबोले, पवन गजभिये, राशीद शेख, रोहित काळे, सहदेव चिखले, सुभाष गजभिये, शेषराव रेवतकर आणि अनूप यादव यांनी ही कारवाई केली.

पोलिसांनी रचला सापळा

अझरुद्दीन घरी येताच पोलिसांनी त्याला सापळा रचून अटक केली. त्याच्या घराची झडती घेतली. त्यानंतर नदीमला अटक केली. नंतर त्याच्या दोन साथीदारांना पकडले. आता केवळ मुंबईचा म्होरक्या जुबेर शेख, अमरावतीचा सोनू काझी (ह. मु. शांतीनगर) आणि शेख आतिक या तिघांचा शोध सुरू आहे. ड्रग्स तस्करांची साखळी तोडण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत.

हेही वाचा – ‘पुट्टेवार’प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गप्प का?; पोलीस कारवाईवरही प्रश्नचिन्ह

कर्मचाऱ्यांचे मधूर संबंध

पोलीस दलातील काही कर्मचाऱ्यांचे मधूर संबंधामुळे ड्रग्स तस्कराला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यंत काही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे ड्रग्स तस्करांसोबतचे संबंध समोर आले होते. काही कर्मचाऱ्यांवर तर गुन्हेही दाखल आहेत. वाडी, जरीपटका आणि हिंगणा पोलीस ठाण्यातील दोन कर्मचारी सध्या ड्रग्स तस्करांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.