वर्धा : जगाच्या पाठीवर निसर्गात असंख्य प्रजाती संशोधकांनी उजेडात आणल्या आहेत. पक्षी, किडे, कृमी तसेच झाडे, वेळी, फुलं व अन्य प्रजाती ज्या ज्ञात नव्हत्या त्या अजूनही सखोल संशोधनाने प्रकाशात येत आहे. प्रथमच मानवाच्या दृष्टीस पडल्याने त्याचे नामकरण पण केल्या जाते. असे अदभूत जीवशास्त्रीय विज्ञान थक्क करून सोडते, हे मात्र खरेच. आता हा बघा नवा जीव. विशेष म्हणजे तो महाराष्ट्रात आढळून आला आहे आणि त्याचे नामकरण पण करण्यात आले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात चंदगड Zoological Survey of India तर्फे यासाठी विशेष संशोधन प्रकल्प राबविण्यात आला होता. पश्चिम घाट म्हणजे जैव विविधतेचा जणू खजिनाच. याच समृद्ध निसर्गकुशीत वसलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात शास्त्रज्ञांनी एका अत्यंत दुर्मिळ आणि जमिनीखाली अधिवास करणाऱ्या तसेच पायांशिवाय असणाऱ्या उभयचर (Legless Amphibian) प्राण्याचा नवीन शोध लावला आहे. दिसायला साप किंवा गांडुळासारखा, परंतु वैज्ञानिक दृष्ट्या पूर्णपणे वेगळा असणारा हा अनोखा जीव पहिल्यांदाच विज्ञानासमोर आला आहे.
शिरपेचात मानाचा तुरा
या शोधामुळे महाराष्ट्राच्या जैवविविधतेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून संशोधकांनी या प्रजातीला स्थानिक बोलीभाषेचा सन्मान करत एक वैशिष्ट्यपूर्ण नाव दिले आहे. ‘गेगेनिओफिस चंदगडी’ असे नामकरण करण्यात आले आहे.
वैज्ञानिक वर्गीकरणात ‘सिसिलियन’ (Caecilian) गटात मोडणाऱ्या या प्राण्याचे शास्त्रीय नाव ‘गेगेनिओफिस चंदगडी’ (Gegeneophis chandgadi) असे ठेवण्यात आले आहे. चंदगड तालुक्यातील बुझावडे गावच्या परिसरात या प्राण्याचा शोध लागला. स्थानिक ‘चंदगडी’ बोलीभाषा आणि परिसरातील ग्रामस्थांच्या पारंपरिक पर्यावरणविषयक ज्ञानाची पोचपावती म्हणून संशोधकांनी या प्रजातीचे नाव ‘चंदगडी’ ठेवले आहे.
ZSI चे सखोल संशोधन
हा महत्त्वपूर्ण संशोधन प्रकल्प ‘झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ (ZSI – पुणे), हळकर्णी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि गोव्यातील म्हादई रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला. संशोधक साहिल शिकलगार, राहुल पाटील, प्रांजल आढाव, निर्मल कुलकर्णी, एन. सी. हिरगुडे, एन. पी. ग्रामपुरोहित, वासुदेव त्रिपाठी आणि के. पी. दिनेश यांच्या टीमने हा शोध निबंध आंतरराष्ट्रीय विज्ञान पत्रिकेत प्रसिद्ध केला आहे. ZSI तर्फे प्रसिद्धी पत्रकातून याची माहिती देण्यात आली.
मानवी वस्तीच्या परिसरातही जैवविविधतेचे अस्तित्व दिसून आल्याचे म्हटल्या जाते. या शोधाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा प्राणी कोणत्याही संरक्षित अभयारण्यात नव्हे तर मानवी वस्ती आणि शेतीच्या परिघात आढळून आला आहे.
गांडूळ नव्हे तर
जमिनीखाली भुसभुशीत मातीत राहणाऱ्या या प्राण्याला अनेकदा गांडूळ किंवा आंधळा साप समजून दुर्लक्षित केले जाते. मात्र, अत्याधुनिक जनुकशास्त्र (DNA Analysis) आणि सूक्ष्म शरीररचना अभ्यासानंतर ही एक पूर्णपणे नवी प्रजाती असल्याचे सिद्ध झाले.
पश्चिम घाटातील दुर्मिळ खजिन्यात भर पडली आहे. सध्या भारतात आढळणाऱ्या उभयचर प्राण्यांच्या एकूण ४५८ प्रजातींपैकी ४१ सिसिलियन प्रजातींची नोंद आहे. या नव्या शोधामुळे ‘गेगेनिओफिस’ वंशातील प्राण्यांची संख्या १२ वर पोहोचली असून, त्यातील ११ प्रजाती केवळ पश्चिम घाटातच आढळतात. संरक्षित जंगलांच्या सीमांपलीकडेही अशा दुर्मिळ जीवांचे अस्तित्व टिकून असल्याचे या शोधाने सिद्ध केले असून, स्थानिक जैवविविधतेच्या संवर्धनाची गरज अधोरेखित केली आहे.
