scorecardresearch

नव्या समीकरणाने गोंदिया, भंडारा जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी

नवीन राजकीय समीकरणामुळे या दोन्ही जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नागपूर : जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात सत्तेसाठी निर्माण झालेल्या नवीन राजकीय समीकरणामुळे या दोन्ही जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महाविकास आघाडीतील दोन प्रमुख घटक पक्ष काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यातील धुसफूस यानिमित्ताने उघड झाली तसेच या दोन्ही पक्षांना पाण्यात पाहणाऱ्या भंडारा भाजपमधील अंतर्गत मतभेदही चव्हाटय़ावर आले.

या राजकीय उलथापालथीस कारणीभूत ठरली ती भंडारा जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतीपदाची निवडणूक. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी या जिल्ह्यात भाजपशी युती केली. त्यामुळे अनेक पंचायत समित्यांमध्ये संख्याबळ अधिक असूनही नानांच्या जिल्ह्यात काँग्रेसला सत्तेबाहेर राहावे लागले. याचा वचपा त्यांनी जि.प. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काढला. माजी आमदार चरण वाघमारे भाजपमध्ये नाराज होते. त्यांचा गट काँग्रेससोबत जाणार अशी चर्चा होती. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न भाजपकडून झाला. पण  वरिष्ठ नेत्यांचा दबाब झुगारून वाघमारे यांनी त्यांचा निर्णय कायम ठेवला. वाघमारे राष्ट्रवादीसोबत सत्तेत बसण्यास इच्छुक नसल्याने ते काँग्रेससोबत गेले.

दुसरीकडे डॉ. परिणय फुके व खासदार मेंढे यांचा गट व राष्ट्रावादी काँग्रेस मिळून सत्ता स्थापनेचा प्रयत्न होता. या माध्यमातून जिल्ह्यातच पटोले यांची कोंडी त्यांना करायची होती. परंतु या प्रयत्नातही त्यांना वाघमारे यांची साथ लागणारच होती. यात त्यांना अपयश आले. उलट भाजपचीच कोंडी झाली.

भंडाऱ्याच्या राजकीय खेळीचे पडसाद गोंदियात उमटले. तेथे काँग्रेसला सुरुंग लावण्याचा प्रयत्न भाजप व राष्ट्रवादीचा होता. येथे भाजपने राष्ट्रवादीशी युती जिल्हा परिषदेत सत्ता हस्तगत करून काँग्रेसची कोंडी केली. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचे नाना पटोले यांच्याशी असलेले राजकीय वैर सर्वश्रूत आहे. पण राज्यात दोन्ही पक्ष एकत्र सत्तेत असताना येथे राष्ट्रवादीने भाजपशी हातमिळवणी करणे अनेकांना खटकले आहे. विशेष म्हणजे, भाजप नेते नेहमीच राष्ट्रवादीच्या नेत्यांना लक्ष्य करीत असताना भाजपशी सलगी करणे याचा चुकीचा संदेश राज्याच्या राजकारणात जाणार आहे. याचा फटका भाजपलाही बसू शकतो. भाजपचा राष्ट्रवादी विरोध हा केवळ देखावा असल्याची टीकाही होऊ शकते.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: New political equation in gondia and bhandara districts for zilla parishad president post zws

ताज्या बातम्या