new transfer policy of medical education department in controversy zws 70 | Loksatta

वैद्यकीय शिक्षण खात्याचे बदली धोरण वादात; आयुर्वेद शिक्षकांच्या बदल्यांमुळे पदव्युत्तर जागा, ‘पीएचडी’ला कात्री

नागपुरातील शालक्य विभागाचे अधिव्याख्याता डॉ. विजय धकाते यांची पदोन्नतीवर सहयोगी प्राध्यापक म्हणून जळगावला बदली झाली.

new transfer policy of medical education department

महेश बोकडे, लोकसत्ता 

नागपूर : केंद्र सरकार एकीकडे देशभरात विशेषज्ञ डॉक्टर वाढवण्यासाठी पदव्युत्तर जागा वाढवण्याची घोषणा करत आहे. दुसरीकडे राज्यात वैद्यकीय शिक्षण खात्याने आयुर्वेद शिक्षकांच्या बदल्या केल्याने बऱ्याच शासकीय आयुर्वेद महाविद्यालयांतील पदव्युत्तर आणि ‘पीएचडी’च्या जागांना कात्री लागल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण खात्याचे बदली धोरण वादात सापडले आहे.

नागपुरातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयातील रोगनिदान विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. गोिवद असाटी यांची प्राध्यापक पदावर शासनाने उस्मानाबादला बदली केली. त्यामुळे नागपुरातील ते गाईड असलेल्या विषयातील ३ ‘पीएचडी’ आणि २ पदव्युत्तरच्या जागा कमी झाल्या. नागपुरातील शालक्य विभागाचे अधिव्याख्याता डॉ. विजय धकाते यांची पदोन्नतीवर सहयोगी प्राध्यापक म्हणून जळगावला बदली झाली. त्यामुळे नागपुरातील या विषयाच्या २ पदव्युत्तर जागा घटल्या. नागपुरातील रसशास्त्र विभागाचे अधिव्याख्याता डॉ. गणेश टेकाडे यांची जळगावला तर या विभागातील दुसरे अधिव्याख्याता डॉ. मनीष भोयर यांचीही पदोन्नतीवर उस्मानाबादला सहयोगी प्राध्यापक म्हणून बदली झाली.

राज्यात जळगावचे महाविद्यालय नवीन असल्याने तेथे पदव्युत्तर अभ्यासक्रम नाही. त्यामुळे तेथे टेकाडे यांच्या नियुक्तीने पदव्युत्तर जागेचा फायदा झाला नाही. उलट नागपुरातील या दोन अधिव्याख्यात्यांच्या बदलीने रसशास्त्र विषयातील ३ ‘पीएचडी’ आणि २ पदव्युत्तरच्या जागांना कात्री लागली. या बदल्या गेल्या काही महिन्यातील असल्या तरी जानेवारी २०२२ मध्येही उस्मानाबाद येथील महाविद्यालयातील बालरोग विभागाचे डॉ. वाय. स्वामी यांची मुंबईच्या महाविद्यालयात बदली झाली होती. तेव्हापासून त्यांच्या उस्मानाबाद येथील ३ पीएचडी आणि २ पदव्युत्तर जागा कमी झाल्या आहे.

उस्मानाबादचे डॉ. आशीष सना यांची नागपुरात बालरोग विभागात बदली झाली. परंतु त्यांच्या बदलीनेही उस्मानाबादच्या १ पदव्युत्तर जागेला कात्री लागली. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण खात्याच्या चुकीच्या बदली धोरणाने राज्यातील पदव्युत्तर व पीएचडीच्या जागांना कात्री लागून केंद्र सरकारच्या विशेषज्ज्ञ तयार करण्याच्या उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याचे आयुर्वेद डॉक्टरांची संघटना असलेल्या नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनच्या (निमा)च्या निरीक्षणात पुढे आले आहे.

शासनाने नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात पदवी जागा सुरक्षित ठेवण्यासाठी काही शिक्षकांच्या बदल्या केल्या. परंतु, सोबत शिक्षकांच्या प्रलंबित पदोन्नतींच्या कामांना गती दिली आहे. त्यामुळे तूर्तास काही अडचणी असल्या तरी येत्या तीन महिन्यात पूर्वीहून जास्त पदव्युत्तर जागा मिळणार आहे. दरम्यान, बदली झालेल्या काही शिक्षकांच्या सेवा वर्ग करून काही पदव्युत्तर जागा व ‘पीएचडी’ वाचवता येतात काय? याबाबतही विचार सुरू आहे.

– डॉ. राजेश्वर रेड्डी, संचालक, आयुष, मुंबई.

नागपुरातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयातील बालरोग विभागात डॉ. अर्चना निकम यांना प्रपाठक पदावरून मार्गदर्शक म्हणून बढती मिळाली. त्यानंतरही येथे नवीन प्रपाठक शासनाने दिले नाही. त्यामुळे येथील तीन पदव्युत्तर आणि एवढय़ाच ‘पीएचडी’च्या जागा मिळत नाही. त्याचा फटका राज्यातील हा अभ्यासक्रम करण्यास इच्छुक गरीब व मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना बसत आहे.

– डॉ. राहुल राऊत, राज्य सचिव, निमा स्टुडंट फोरम.

शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात विद्यावेतन मिळत असल्याने गरीब व मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षणासह आर्थिक पाठबळही मिळते. परंतु, चुकीच्या बदली धोरणाने शासकीय महाविद्यालयातील जागा कमी होण्यासह विद्यार्थ्यांच्या संधी कमी करण्याचा प्रताप वैद्यकीय शिक्षण खात्याकडून होत आहे.

-डॉ. मोहन येंडे, राज्य समन्वयक, निमा.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 04:38 IST
Next Story
संमेलनाच्या मांडवातून.. कोटींची ‘कृतज्ञता’!