ट्रकच्या धडकेत पतीचा मृत्यू

खासगी रुग्णालयात सेवा देणाऱ्या पंचवीस वर्षीय तरुणाचे गेल्या महिन्यातच लग्न झाले होते. नवीन जीवनाची सुरुवात होऊन दोघेही आनंदाने नांदत असतानाच सोमवारी पतीच्या दुचाकीला एका भरधाव ट्रकने नंदनवन परिसरात धडक दिली. त्यात पतीचा मृत्यू तर त्यांच्या सहकारी गंभीर जखमी झाला. महिन्याभरातच महिलेचे कुंकू पुसल्या गेल्याने नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त होत होती.

लोकेश शामराव देशमुख (२५, रा. सेनापतीनगर, नागपूर) असे मृत व्यक्तीचे तर तपशु बाळू मेश्राम (१७) असे जखमीचे नाव आहे. लोकेश हा नागपूरच्या मेडिकल चौकातील एका खासगी रुग्णालयात कामाला होता. मनमिळावू स्वभाव असल्याने त्याची रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांशी लवकरच ओळख होत होती. त्याला रुग्णांची मालिश करण्याचे कौशल्यही अवगत होते.

पक्षाघात झालेल्या रुग्णांच्या मालिशसाठी चांगली मागणी असायची. त्याचे उत्पन्न चांगले असल्याने गेल्या महिन्यातच त्याच्या कुटुंबीयांनी त्याचे लग्न लावून दिले होते. लग्नानंतर दोघेही सुखाने नांदत होते.

घरची आर्थिक स्थिती जेमतेमच असल्याने तो लग्नाच्या काही दिवसानंतरच पुन्हा सेवेवर रूजू झाला होता. नेहमीप्रमाणे ६ मार्चला तो दुपारी महालगाव- कापसी येथे एका रुग्णाची मालिश करण्यासाठी तपशु बाळु मेश्राम याच्यासह दुचाकीवर गेला. ही दुचाकी त्याने मित्र रोशन कृष्णाजी ठवकरकडून घेतली होती. काम आटोपल्यावर तो दुचाकीवर घरी येत असताना नंदनवन परिसरात जबलपूर- हैदराबाद मार्गावर ट्रकची त्यांना जोरदार धडक लागली. ट्रकच्या चाकाखाली लोकेशचा पायही आला. हा प्रकार निदर्शनात येताच ट्रकचालक वाहनासह पळून गेला. नागरिकांनी तातडीने दोघा जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवले.

दोघांवर उपचार सुरू असतांना लोकेशचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. दरम्यान, अपघातस्थळी बघ्यांची गर्दी जमल्याने व जमाव संतप्त झाल्याने तणाव निर्माण झाला होता. परंतु पोलिसांनी बंदोबस्त वाढवल्याने अनुचित घटना टळली. पोलिसांकडून ही माहिती देशमुख कुटुंबीयांना कळताच त्यांनी रुग्णालयात धाव घेतली.

परंतु त्याचा मृत्यू झाल्याचे कळताच हळहळ व्यक्त केली जात होती. विशेष म्हणजे दुचाकी चालवताना लोकेशने हेल्मेट घातले नव्हते. त्याच्या पायावरून वाहन गेल्याने व जास्त रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज आहे. शवविच्छेदन अहवालातच नेमके कारण कळणे शक्य होणार आहे.