ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात अनेक बलाढ्य वाघ जन्माला आले, तर काहींनी बाहेरून येऊन येथे साम्राज्य प्रस्थापित केले. ‘मटकासुर’ हा त्यापैकीच एक. मात्र, रविवारी जिकडेतिकडे त्याच्या मृत्यूची वार्ता पसरली आणि वन्यजीवप्रेमींच्या वर्तुळात एकच गदारोळ उडाला.
ताडोबात सहज दर्शन देणारा आणि आपल्या रुबाबदार चालीने पर्यटकांना वेड लावणारा ‘मटकासुर’ हा वाघ गेल्या ऑगस्ट महिन्याच्या अखेरपासून अनेकांना दिसला नाही. त्याने ‘ताडोबा’च्या साम्राज्यावर एखाद्या अभिषिक्त सम्राटाप्रमाणे राज्य केले. गेली काही वर्षे आपली एकहाती सत्ता राखली, दहशत गाजवली. त्याच्या राज्यात घुसखोरी करायची कोणाची हिंमत नव्हती. मात्र, अलीकडे त्याचे वय झाल्याने त्याला अनेकदा माघार घ्यावी लागली. ‘मटकासुर’ची कथा ‘छोटी तारा’ आणि ‘माया’ या वाघिणीच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्याचा स्वतःचा ‘छोटी तारा’ पासून झालेला मुलगा ‘छोटा मटका’ त्याचा विरोधक बनला. त्यांच्यासोबतच ‘रुद्र’ आणि ‘ताला’ यांनीही त्याला आव्हान दिले. त्यांच्यासोबतच्या युद्धात तो जखमी देखील झाला आहे. त्यामुळे आताही त्याने आपले क्षेत्र सोडून दुसरीकडे मोर्चा वळवला असावा, असा अंदाज त्याला नेहमी पाहणाऱ्या वन्यजीवप्रेमींच्या वर्तुळात व्यक्त केला जात आहे.
समाजमाध्यमावर त्याच्या मृत्यूची अफवा पसरली आहे. मात्र, त्याचे कोणतेही पुरावे नसल्याने त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन वनखात्यातील अधिकारी व वन्यजीव अभ्यासकांकडून केले जात आहे.