महापालिकेच्या आरोग्य विभागाचा अजब कारभार; उष्माघाताच्या मृत्यूची माहिती घेणारी स्वतंत्र यंत्रणा नाही
महेश बोकडे
नागपूर : महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे उष्माघाताच्या मृत्यूची माहिती घेणारी स्वतंत्र यंत्रणा नाही. यासंदर्भात ज्यांच्याकडे माहिती असते ती रुग्णालये किंवा पोलीस खात्याशी समन्वय नाही. त्यामुळे वर्तमानपत्रात उष्माघाताबाबत प्रकाशित झालेल्या वृत्ताच्या आधारावर हा विभाग उष्माघाताच्या संशयित मृत्यूची नोंद घेतो, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
उपराजधानीतील तापमानवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसू लागला आहे. गुरुवारी शहराचे तापमान ४४.८ अंश सेल्सिअसपर्यंत गेले होते. उन्हाचा फटका बसलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. खासगी, शासकीय रुग्णालयात ताप, हगवण, अपचनासह उष्माघात सदृश्य आजाराचे रुग्ण वाढले. दुसरीकडे शहरात बेघर आणि भटक्या नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.
त्यांच्या मृत्यूची नोंद पोलीस खाते आकस्मिक मृत्यू अशी करतात. महापालिकेच्या आरोग्य विभागाचा शहरातील खासगी व शासकीय रुग्णालयांशी समन्वय नाही. त्यामुळे या रुग्णालयात दाखल उष्माघाताशी संबंधित रुग्णांची माहिती महापालिकेला मिळत नाही. उष्माघाताच्या मृत्यूचे वृत्त वर्तमानपत्रात प्रकाशित झाल्यावर आरोग्य विभागाचे कर्मचारी संबंधित मेडिकल-मेयो रुग्णालयातील शवविच्छेदन गृहात जातात. परंतु तेथूनही त्यांना माहिती मिळत नाही. त्यामुळे शवविच्छेदन अहवालानंतरच संबंधित मृत्यू उष्माघाताने वा अन्य कारणाने झाला, हे स्पष्ट होईल, असे सांगून महापालिकेचा आरोग्य विभाग मोकळा होतो. याबाबत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.
सात संशयितांच्या मृत्यूची नोंद
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे गुरुवापर्यंत उष्माघाताचे ६९ आणि ७ संशयित मृत्यूंची नोंद आहे. ही नोंद विविध वर्तमानपत्रात भटके वा बेघरांच्या आकस्मिक मृत्यूच्या बातम्यांतून केली गेली आहे. मध्यंतरी पोलिसांना आकस्मिक किंवा उष्माघाताच्या मृत्यूची वेळीच सूचना देण्याची विनंती करण्यात आली होती. परंतु, आताही महापालिकेला माहिती मिळत नाही.
मेडिकल, मेयोतही रुग्णांची लपवा-छपवी?
मेडिकल आणि मेयो या दोन्ही रुग्णालयांत रोज पाच हजारांच्या जवळपास रुग्ण उपचाराला येतात. त्यात उन्ह लागल्याने त्रास होणारेही बरेच असतात. ते उपचाराकरिता रुग्णालयात दाखल होत नसल्याने त्यांना उन्हाशी संबंधित आजार असल्याच्या नोंदीच येथे होत नसल्याची सूत्रांची माहिती आहे. खासगी रुग्णालयांतही या नोंदी केल्या जात नाही. हल्ली जनजागृतीमुळे उन्हात जास्त लोक बाहेर पडत नसल्याने उष्माघाताचे रुग्ण कमी झाल्याचा दावा केला जातो.

उत्तरीय तपासणी अहवालही नाही
बेघर वा भटक्या व्यक्तींच्या शविवच्छेदनाचे अहवाल महापालिकेच्या आरोग्य विभागाला थेट मेडिकल आणि मेयोच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागाकडून मिळायला हवे. परंतु तसे होत नाही. शविवच्छेदनाचे अहवाल महापालिकेला संबंधित पोलीस ठाण्यातून घेण्याचा सल्ला दिला जातो. शासकीय यंत्रणेलाच हे अहवाल मिळत नसल्याने मृत्यू उष्णाघाताने झाल्याचे महापालिकेने कसे निश्चित करावे, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
उष्माघाताच्या नोंदी वेळीच कळवाव्या, यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शासकीय व खासगी रुग्णालयांशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. याचबरोबर, बेघर व भटक्या व्यक्तींच्या मृत्यूची माहिती वेळीच कळवण्याबाबत पोलिसांनाही विनंती केली आहे. या सर्व यंत्रणेशी महापालिकेचा समन्वय आहे. यंत्रणेत काही त्रुटी असल्यास ती दूर केली जाईल.– डॉ. नरेंद्र बहिरवार, मुख्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका.